कृतज्ञता: जादूचा दिवा

 अनेक ज्ञात-अज्ञात मान्यवरांच्या कृतज्ञतेविषयक विचारांनी भारावलेला हा लेख आहे. कृतज्ञतापूर्वक आपणांसमोर सादर करत आहे.



तुम्ही करु शकता, अशा सर्वात चांगल्या आध्यात्मिक गोष्टींपैकी एक, म्हणजे स्वतः माणुसकी स्विकारणे. माणुसकी असणारी व्यक्ती, इतरांचे आभार मानते. धन्यवाद देते.


'धन्यवाद!' हा सर्वोत्तम प्रभावी शब्दांपैकी एक आहे, जो कोणीही म्हणू शकतो.  मी हा प्रभावी शब्द नेहमी वापरत असतो. रेस्टॉरंट मध्ये खाणे वाढणारा वेटर असो वा टेबल साफ करणारा मुलगा असो, रिक्षा/टॅक्सी ड्रायव्हर असो वा रस्त्यात समोरासमोर आल्यावर, प्रथम मला जाऊ देणारी व्यक्ती असो, वा छोटीमोठी मदत करणारी कोणतीही व्यक्ती असो.. 'धन्यवाद' हे प्रभावी शब्द तोंडातून आपसूकच बाहेर येतात.


'धन्यवाद म्हणणे', आपल्यातील, नम्रता व समजूतदारपणा व्यक्त करते.


आभार मानणे, ही कृतज्ञतेची सुरुवात आहे.

कृतज्ञता म्हणजे आभार व्यक्त करण्याची पूर्णता.

आभार व्यक्त करताना, केवळ शब्द असू शकतात.  कृतज्ञता कृत्यांमध्ये दर्शविली जाते.


कित्येकदा, धन्यवाद बोललास ना, झाले तर.. असा दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. पण, खरी कृतज्ञता ही कृतींमधूनच व्यक्त केली जाऊ शकते.


'कृतज्ञता दाखवणे', ही सर्वात सोपी पण सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे, जी मनुष्य एकमेकांसाठी करु शकतो. लक्षात घ्या, प्राणीपक्षी यांनी आपल्या कृतीतून हे इतिहास काळापासून ते आजपर्यंत सिद्ध केले आहे. मग, बहुसंख्य मनुष्य प्राणी कशामुळे स्वकेंद्रित होत चालला आहे?


कृतज्ञतेचे फायदे:

कृतज्ञता, ही नकारात्मक भावनांवर उतारा आहे. 

कृतज्ञता ही; मत्सर, शत्रुत्व, चिंता आणि चिडचिड यांचा निचरा करते. 

कृतज्ञता जीवनाची लज्जत वाढवते. 

कृतज्ञता कुणालाही गृहीत धरत नाही; 

कृतज्ञता वर्तमान-केंद्रित आहे.


जेव्हा मी मला परमेश्वराने दिलेल्या; चांगल्या गोष्टी, अमूल्य जीवन, शरीर, नाती, बुद्धी, सकारात्मक दृष्टिकोन, माझ्या विषयातील ज्ञान, शिकण्याची वृत्ती, प्रशिक्षण क्षेत्रातील कौशल्ये, इत्यादी मोजायला सुरुवात केली; तेव्हापासून माझे संपूर्ण आयुष्य प्रसन्नतेने व्यापले गेले आहे..


कृतज्ञता, ही मानवी भावनांपैकी सर्वात निरोगी भावना आहे.  आकर्षणाच्या नियमानुसार, तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल तुम्ही जितकी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल, तितकीच तुमच्याकडे कृतज्ञता व्यक्त करण्याची शक्यता असणारे प्रसंग, यश, प्रसिद्धी, पैसा, मनःशांती, सुदृढ नातेसंबंध, सामाजिक प्रतिष्ठा, इत्यादी सकारात्मक बाबी जास्त येतील व येत राहतील.


जेव्हा, तुम्हाला मिळालेल्या प्रेमाबद्दल मनापासून कृतज्ञता बाळगण्यात तुम्ही यशस्वी असता, तेव्हा इतरांवर विनाअट प्रेम करणे तुमच्यासाठी सोपे असते. आणि तुम्हाला सुद्धा अखंड अविरत प्रेम लाभत राहते.


व्यक्त केलेली कृतज्ञता, आपल्याला भूतकाळाची जाणीव करुन देते, वर्तमानकाळात शांतता आणते आणि भविष्याची दृष्टी निर्माण करते!


कृतज्ञता व्यक्त करण्याअगोदर, आपणाला केली गेलेली मदत/सहकार्य लक्षात ठेवणे, त्यांची जाणीव राखणे, अत्यावश्यक असते.


बालवाडीत असताना, आयाचे काम करणाऱ्या मान्यवर महिला; कॉलेजमध्ये असताना मारामारी करायला जाताना दरडावून समजूत घालणारे कुटुंबमित्र; माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये गंभीर असताना रात्रभर माझ्या सोबत असणारे माझे साडू; आज गरज पडल्यावर धावून येणारे तरुण, समवयस्क व वरिष्ठ मित्रमैत्रिणी; इत्यादी.. प्रसंग व यादी, फार मोठी आहे..


कृतज्ञता प्रत्येक गोष्टीवर थोडे हास्य रंगवते, 

त्यांना जादुई स्पर्श करते.


आपण कधीही कृतज्ञ नसलेल्या व्यक्तीला, खऱ्या अर्थाने आनंदी, पाहू शकणार नाही.


कृतज्ञ नसलेल्या व्यक्ती, तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या हजारो गोष्टींबद्दल आभार मानण्याऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या एका गोष्टीबद्दल तक्रार करतात. अशा व्यक्तींबरोबर वाद घालण्याऐवजी, त्यांना समजावून सांगा. त्याने गोष्टी बदलत नसतील तर, नकारात्मकता वाढविण्याऐवजी, शांतपणे सकारात्मकतेने अलिप्त व्हा.


याउलट, आपण जेव्हा जेव्हा कृतज्ञता कृतींमधून व्यक्त करतो; तेव्हा तेव्हा समोरील व्यक्ती/व्यक्तींचा, चांगलपणावरचा विश्वास वाढू शकतो. आजच्या काळात, याचे महत्त्व फार मोठे आहे.


आजपासून, आपल्या जवळच्या व महत्वाच्या व्यक्तींशी संवाद साधा. त्यांना आत्मीयतेने सांगा, "माझं तुझ्यावर प्रेम आहे", "मला माफ करा", "मला तुझं कौतुक वाटतं", "मला तुझा अभिमान आहे"... 


तुम्हाला जे वाटतं ते मेसेज मधून पाठवा, एक गोंडस टीप लिहा, तुमच्या जवळच्या व महत्वाच्या नात्यांचे, तुमच्या आयुष्यातील महत्व ओळखा, आणि ते शेअर करा... आज त्यांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करा... आणि शक्य असल्यास, त्यांना जवळ घ्या. 


कॅथलीन कीटिंग आणि मिमी नोलँड यांनी त्यांच्या संशोधनातून सिद्ध करुन दाखवले आहे की, प्रेमळ व निर्मळ मिठीचे; बुद्धिमत्ता, आत्मसन्मान आणि ताणतणाव नियोजन यावर सकारात्मक परिणाम होतात.


तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहण्याची आणि सतत आभार मानण्याची सवय जोपासा. आणि कारण सर्व गोष्टींनी तुमच्या प्रगतीला हातभार लावला आहे, तुमच्या कृतज्ञतेमध्ये तुम्ही सर्व गोष्टींचा समावेश केला पाहिजे.


आपल्या जीवनात बदल घडवणाऱ्या लोकांचे थांबून आभार मानण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपण वेळ शोधला पाहिजे.


संकलक: बिपिन मयेकर



Comments

Popular posts from this blog

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

आजार, आधार आणि दृष्टिकोन