तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?
यावर एका मित्राने विचारले, "तारतम्य म्हणजे फक्त एव्हढेच काय?"
मला सांगावे लागले, "अरे, हे फक्त संवादातील एका कोनावर आधारित आहे. पण तरीही यातील गाभा तारतम्याच्या व्याख्येला लागू होतो. तो म्हणजे स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची योग्य जाणीव!"
कुठे व किती पुढे व्हायचे आणि कुठे व किती वेळ थांबायचे; हे नोकरी/व्यवसाय असो वा नातेसंबंध; राजकारण असो वा छंद; हे उमगले_समजले की एक तर प्रगती होते व परिस्थिती विपरित असेल तर अधोगती होत नाही.
श्री. अमिताभ बच्चन यांनी हिरोचे रोल करताना, अनेक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले होते. पण नंतर त्यांचे वय वाढू लागले, तरीही हिरोचे चित्रपट करणे सुरु होते. परिणामी चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी पॉझ घेऊन, हळूहळू चरित्र भूमिकांकडे रोख वळवला. आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळू लागले. त्यांच्या समकालीन नायकांना त्यांच्याइतके यश मिळालेले नाही.
नोकरी करणाऱ्या, अनेक जणांनी थांबून विचारपूर्वक नियोजन करुन व्यवसाय सुरु करुन प्रचंड यश मिळवले आहे. पण काही जणांनी, 'उद्योजक व्हायचं आहे' या भरात, अतिउत्साहाने आपली निवृत्तीनंतरची सर्व रक्कम अर्धवट नियोजन असलेल्या व्यवसायात गुंतवली व आज पश्र्चाताप करत आहेत.
नोकरी करत असताना, कधीकधी कॉर्पोरेट पॉलिटिक्सला सामोरे जावे लागते. काही जण कंटाळून राजीनामा देऊन मोकळे होतात, तर काही जण ऑफिसमधील राग घरी येऊन काढतात. तर काही जण, राजकारणाला राजकारणाने उत्तर देत टिकून राहतात व संधी साधून पुढे निघून जातात.
राजकारणात सुद्धा योग्य वेळी थांबणारे व योग्य वेळी पुढाकार घेणारे सत्तेच्या स्पर्धेत पुढे जात राहतात.
नात्यांमध्ये सुद्धा, प्रत्येकाचा समजूतदारपणा वेगवेगळ्या क्षमतेचा असतो. मग या प्रत्येक नात्याबरोबर वागताना_बोलताना कस लागतो. तिथे वरील संवादाच्या प्रमाणाचा वापर करावा लागतो.
या सर्व क्षेत्रात, आपण फक्त स्वत:चा 'आत्मसन्मान' व 'गर्व' तसेच 'संयम' व 'मिळमिळीतपणा' यातील फरक ओळखायला शिकलो पाहिजे.
चला होऊ या प्रसन्न!
आपलाच,
बिपिन मयेकर
७०२१५०८४७०

Comments
Post a Comment