आजार, आधार आणि दृष्टिकोन


 आजार, आधार व दृष्टिकोन:


भारतामध्ये एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या आजारी असेल तर त्याची योग्य रीतीने काळजी घेतली जाण्याची शक्यता असते. परंतु एखादी व्यक्ती मानसिक अथवा भावनिक दृष्ट्या आजारी असेल तर मात्र त्याची काळजी घेतली जायची शक्यता कमी होत जाते. कारण बहुतेक वेळा, अनेक जणांची या दृष्टिकोनातून जडणघडण झालेली नसते.


माझ्या एका मित्राकडे गेलो असता, त्याचा मुलगा सांगत होता की त्यांच्या शेजाऱ्याचा मुलगा, त्याचा मित्र, खेळायला येताना सोबत चाकू घेऊन येतो. शाळेतील मुलगा चाकू घेऊन येतो, हे ऐकून सर्वांना धक्का बसला. मी मित्राला सुचवले की, तुझ्या शेजारी राहणाऱ्या पालकांनी, त्यांच्या मुलाचे तज्ञ व्यक्तीकडून समुपदेशन करुन घ्यायला हवे.


थोड्या दिवसांनी, माझ्या मित्राने कळवले की, समुपदेशनाचा विषय काढताच, (त्याचे शेजारी, जे उच्च विद्याविभूषित आहेत) भडकले. 


जर शिकलेल्या व्यक्तींमध्ये गैरसमज असतील,तर अशिक्षित समाजात काय होत असेल?


तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये, खालीलपैकी एखादी वा अधिक लक्षणे आढळली तर तुम्हाला त्यांची विशेष सक्रिय काळजी घ्यावी लागते:


१. सतत शांत राहणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड करते.

२. सतत दुसऱ्याशी तुलना करणे. नकळत तुलना करणाऱ्या व्यक्तीचा राग करणे.

३. सतत स्वतःला महत्व घेण्याचा प्रयत्न करणे. तो न मिळाल्यास, आक्रस्ताळेपणा करणे.

४. साध्या गोष्टी करताना, आत्मविश्वास नसणे.

५. एकाग्रता हरवणे.

६. साधे निर्णय न घेता येणे.

७. सतत एकटे राहणे किंवा सतत व्यसनाधीन मित्रांसोबत राहून, नशेमध्ये असणे.

८. खाण्याच्या व झोपण्याच्या सवयी बदलणे.

९. सतत थकवा जाणवण्याची तक्रार करणे.

१०. सतत निराश वा दुःखी असणे.


अशा वेळी, तुमच्या जवळच्या व्यक्तीला, तुमची जास्त गरज असते. पण, ती न समजल्यामुळे, अनेकदा अशा व्यक्तींना टोमणे मारले जातात, किंवा हेटाळणीयुक्त स्वरात बोलले जाते. यामुळे, अशा व्यक्ती नैराश्याच्या गर्तेत अजून खोल बुडत जातात.


यामुळे, गंभीर शारिरीक आजार होण्याची शक्यता बळावते. आणि यातच काही जणांचा अंत होतो.


तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी, आर्थिक रितीने विकत घेतलेल्या वस्तू वा सेवा, आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही तुमच्या जवळच्या माणसासाठी, काय करू शकता, याबरोबर किंवा यापेक्षा, तुम्ही भावनिक आणि मानसिकरित्या जवळच्या व्यक्तीला कसे वागवता, हे जास्त महत्त्वाचे आहे. नुसत्या भेटवस्तू देण्यापेक्षा, तुम्ही नेहमीच प्रेम, आपुलकी आणि भावनिक आधार निवडायला हवा.  समोरील व्यक्तीला या सर्वांची उर्जा हवी असते.


समोरील व्यक्तीला समजेल अशा प्रकारे तुमचे प्रेम दाखवण्याची गरज असते.


अजूनही भारतात यादृष्टीने जास्त प्रयत्न होताना आढळत नाहीत. समाजामध्ये ही जागरुकता पसरवण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा.


लक्षात ठेवा:


केवळ शारिरीक नव्हे तर, मानसिक अथवा भावनिक दृष्ट्या आजारी असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा मदतीची गरज असते.


 काही मानसिक अथवा भावनिक आजार, हे सर्वसाधारण असतात, पण वेळीच लक्ष दिले नाही तर गांभीर्य वाढू शकते.


 • सदर व्यक्तींना आदराची गरज असते.

 • आधार हवा असतो.

 • विश्वास हवा असतो.

 • मर्यादा आखून दिलेल्या आवश्यक असतात. अन्यथा त्यांना सहानुभूतीच्या कुबड्या घेऊन जगायची सवय लागू शकते.

 • जेव्हा त्यांना आवश्यक असते, तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असणे; आवश्यक असते.

• त्यांना सहानुभूती न देता, वा न चिडता, आहे तसे त्यांना स्विकारणे, आवश्यक असते.

• त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांना प्रोत्साहन व मदत देणे, आवश्यक असते.

यासोबतच, योग्य समुपदेशन प्राप्त झाले तर, अशा व्यक्ती, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान प्राप्त करुन, आयुष्यात परत सन्मानाने उभ्या राहू शकतात. 


आपलाच,

बिपिन मयेकर

वैयक्तिक समुपदेशक

७०२१५०८४७०

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?