१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

 हेवा, मत्सर व द्वेष:

मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना

लेखक: बिपिन मयेकर ©


भाग एक: हेवा

तुमचे लहानपण कसे गेले होते, याचा तुमच्या व्यक्तीमत्वावर, खास करुन, तुमच्या मनस्थितीवर, फार मोठा प्रभाव झालेला असण्याची दाट शक्यता असते. 

तुमच्या लहानपणी जर कुटुंबात, तुमच्याकडे सतत दुर्लक्ष केले गेले होते किंवा तुमच्या इमारतीत वा शाळेमध्ये तुम्हाला, स्वतःकडे लक्ष (attention) हवे होते. पण, तुमच्या भित्र्या स्वभावामुळे, तुम्हाला ते मिळाले नव्हते.

अथवा, एकुलती/एकुलता एक असल्यामुळे किंवा आई-वडिलांनी फाजील लाड केल्यामुळे, सतत स्वतःला हवे तेच करण्याची व लक्ष खेचून घेण्याची सवय लागते.

वरील दोन्ही प्रकारच्या (यापेक्षा अधिक प्रकार असू शकतात) लहानपणीच्या संगोपनामुळे (upbringing), मोठेपणी न्यूनगंड वा गर्व असलेले व्यक्तीमत्व तयार होत जाते. त्यातून अंतर्गत भिती वाढत जाते. भितीतून तुलना जन्म घेते. यातून 'हेवा' निर्माण होण्याची सहज शक्यता तयार होऊ शकते.

हेवा, म्हणजे दुसर्‍याला लाभलेल्या फायद्याबद्दल, असंतोषजनक जाणीव किंवा त्याला होणाऱ्या फायद्याचा त्रास होणे व तसाच समान लाभ घेण्याची इच्छा मनात निर्माण होणे.

मी भल्या भल्या चांगल्या व्यक्तींना, या हेव्याच्या विळख्यात अडकून चुकीचे वागताना पाहिले आहे, अनुभवले आहे. तर मोठमोठे यश संपादन केलेल्या महानुभावांना कळत नकळत 'हेवा' व्यक्त करताना ऐकले आहे.

आमच्या 'प्रसन्न व्याख्यानमाले'च्या उद्घाटनप्रसंगी, एका मिडियामध्ये प्रसिद्ध एका डॉक्टरांनी, प्रथम व्याख्यान ज्यांचे होते, अशा ऋषीतुल्य डॉक्टरांचा डॉ. विठ्ठल प्रभू सर, यांचा व  'लैंगिकता शिक्षण' या त्यांच्या विषयाचा, भर व्यासपीठावरुन अपमान केला होता. हॉलमध्ये खळबळ उडाली होती. उपस्थितांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव येऊ लागले. 

संपूर्ण प्रसन्न व्याख्यानमाला, त्याचे आयोजन व संचालन, 'प्रसन्न परिवार' करत असे. मी फक्त बाजूला वा समोर बसून, त्यांचे प्रयत्न व कुशलता अनुभवत असे. कधीच व्याख्यानमालेत न बोलणारा मी त्यावेळेस हात उंचावून परवानगी घेऊन बोललो. 'लैंगिकता शिक्षण'  हा विषय समाजासाठी किती महत्वाचा आहे व डॉ. विठ्ठल प्रभू, किती प्रगल्भतेने समाज जागृतीचे कार्य करत आहेत, ते वनमाळी हॉलमध्ये उपस्थितांना समजावले.

डॉ. विठ्ठल प्रभू सरांचे मार्गदर्शन झाल्यावर, हॉलमध्ये उपस्थितांनी उभे राहून, कित्येक मिनीट्स टाळ्या वाजवून, त्यांना मानवंदना दिली होती. डॉ. विठ्ठल प्रभू सर, सुरुवातीला टिका/निंदा ऐकताना व नंतर स्तुती ऐकताना, दोन्ही वेळेस स्थितप्रज्ञ होते. वंदन.

'हेवा' भावना, कुठे व कोणत्या पार्श्वभूमीवर मनात निर्माण होते, यावर 'हेवा' या भावनेची नकारात्मकता ठरते.

आणि ती व्यक्ती सारखी समोर येत राहिली किंवा आपल्या सोबतच्या व्यक्तींमध्ये, त्या व्यक्तीची वा त्या व्यक्तीकडे असणाऱ्या बाबींची चर्चा होत राहिली व त्यामुळे त्रास होऊ लागला की मग हेवा नकारात्मक स्वरुप गाठू शकतो. आणि हळूहळू या हेव्याचे रुपांतर मत्सरामध्ये होत जाते.

मत्सर ही नकारात्मक भावना आहे. आणि ही नकारात्मक भावना, नकारात्मक वागण्या_बोलण्यास उद्युक्त करत राहते. यातील हुशार माणसे चांगुलपणाचा मुखवटा घालून वावरतात..

पण, यांची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांची हालचाल, वापरत असलेले शब्द, त्यातील चढ-उतार, शक्य असल्यास, हस्तांदोलन वा इतर सामाजिक दृष्ट्या सुरक्षित स्पर्श यातून, समोरील व्यक्तीच्या मनात असलेला हेवा किंवा मत्सर ओळखता येतो.

जर आपल्याकडे, स्वयं जागरुकता असेल, तर नकारात्मक भावना मनात शिरत असताना, आपल्याला जाणीव होते. तिला वेळीच प्रतिबंध केला, तर पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही. 'हेवा'करण्यापेक्षा, त्या व्यक्तीला वा त्यांच्याकडील बाबींना (यश, प्रगती, प्रसिद्धी, पैसा, जीवनशैली, गुणवत्ता, इत्यादी) ध्येय मानणे आणि त्या व्यक्तीलाच आदर्श ठेवत, ध्येय सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे; सकारात्मक व वास्तववादी असते.

तेव्हा, पुढील उर्वरित दोन भागांत, आपण 'मत्सर' व 'द्वेष' यांच्याबद्दल माहिती घेऊ या.


आपलाच,

बिपिन मयेकर©

प्रसन्न प्रशिक्षणक्रम 

७०२१५०८४७०

सदर लेख, नाव व फोन क्रमांक सहित शेअर करु शकता.




Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?