मैत्री: नाण्याच्या दोन बाजू

मैत्री: नाण्याच्या दोन बाजू!

           चालण्याचा व्यायाम (walk) करताना, मी एखाददुसऱ्या ठिकाणी थांबतो. कालही थांबलो होतो. बाजूला चार अमराठी तरुण गप्पा मारत होते. आजूबाजूला इतरांच्या कानावर आपले शब्द पडतील, यांची तमा न बाळगता बोलत होते. एका मित्राच्या बाबतीत चर्चा होती. उर्वरित तिघांपैकी, एक जण त्याच्या बाजूने बोलत होता; तर दुसरा वेगळे मत नोंदवत होता. तिसरा कसलीही फिकीर न करता, मोबाईलमध्ये बहुधा गेम खेळत होता.

ज्या मित्राच्या बाबतीत बोलणे सुरु होते, एक जण त्याला समजावत होता की, तू तुझ्या गर्लफ्रेंडला आयुष्यात करिअरमध्ये पुढे जाऊ देत नाहीस, हे योग्य नाही. तर दुसरा बाजू घेऊन बडबडत होता, जर तिने प्रगती केली तर, त्या मुलीचे आई-वडील तिचे लग्न तोलामोलाच्या मुलाबरोबर करुन देतील आणि हा मित्र बाजूला राहील. 

ज्याच्याबद्दल ती चर्चा सुरु होती, त्याचे मत सुद्धा तेच होते, 'तिने प्रगती केली तर, हा बाजूला पडू शकतो.' ही चिंता त्याला सतावत होती, म्हणून तो आपल्या खास मैत्रिणीला जमेल त्या प्रकारे, प्रगतीच्या मार्गावरुन मागे खेचत होता. चौथ्या मित्राला विचारलं असता, त्याने सरळ मित्रांना धुडकावून लावले, "करने दे ना, उसको जो करना हैं| तेरामेरा क्या लेना देना?"

माझ्या समोर, मैत्रीचे चार प्रकार होते. एक जण, न्यायाची भूमिका मांडत होता. दुसरा, कर्णाप्रमाणे दुर्योधनाची साथ देत होता. तिसरा, स्वतःच्या स्वार्थासाठी जिच्यावर प्रेम करतो, तिचेच आयुष्य नकळत उध्वस्त करत होता; तर चौथा पूर्णपणे स्वकेंद्रित होता.

नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वतः तुम्ही!

तुमच्या अवतीभवती वरीलपैकी असे चार मित्र किंवा यापेक्षा थोडे वेगळे मित्र असतील, तर त्यांचा प्रभाव तुम्ही स्वतःवर कशा रितीने पडू द्याल?

आपल्या आजूबाजूला असेच मैत्रीचे वेगवेगळे प्रकार बघायला अनुभवायला मिळतात. तुमचे मित्र मैत्रिणी कसे आहेत?

बहुतेक वेळा मित्र हे हायड्रोजन, ऑक्सिजन व क्लोरीन प्रमाणे असतात. तुम्ही स्वतःला हायड्रोजन असे गृहीत धरलेत, तर तुमच्या सोबत असणारे मित्र व मैत्रिणी हे, ऑक्सीजन आहेत की क्लोरीन आहेत; यावर तुम्हाला लक्ष ठेवावे लागते. हायड्रोजन सोबत ऑक्सिजन आला तर जीव वाचवणारे पाणी (H2O) निर्माण होते. तर ऑक्सिजन सोबत, क्लोरिन आले तर, जीव घेऊ शकणारे ॲसिड (HCL) निर्माण होऊ शकते.

वरील उदाहरणामध्ये, परखड व सत्य बोलणारा जो मित्र आहे, असे कितीसे मित्र-मैत्रिणी तुमच्या सभोवती आहेत? त्यांचा परखडपणा कित्येकदा टोकाचा असू शकतो. पण त्यांनी सांगितलेल्या सत्याकडे डोळेझाक केली तर भविष्यात वेगळे परिणाम होऊ शकतात.

न्यायाची भूमिका मांडणारा, कधीकधी पटत नाही, कारण तो जे बोलतो ते फायद्याचे नसते.

वरील उदाहरणामध्ये, आपले चुकत असून सुद्धा आपली बाजू घेणारा मित्र, हा एका बाजूने आवडता असतो. परंतु केवळ बाजू न घेता, त्याने आपल्या आयुष्यातील चांगले निर्णय घ्यायला, आपल्याला कळत-नकळत सहकार्य केले व संवाद साधला; तर तो खरा मित्र होऊ शकतो.

मित्रमंडळींमध्ये एखादा अन्यायाने वागणाला मित्र असेल, तर त्याला प्रथम मित्राप्रमाणे समजावणे योग्यच. परंतु केवळ समजावून तो ऐकत नसेल, तर तुमची भूमिका काय असेल?

चौथा मित्र, ज्याला कोणाचीच व काहीही पडलेले नाही. 

मित्रांचे चांगले होऊ दे अथवा वाईट, याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणि जो केवळ टाईमपास पुरता मित्रांमध्ये येतो, त्याला मित्र तरी म्हणावे काय?

वरील उदाहरणामध्ये, जो मुलगा आपल्या खास मैत्रिणीला, स्वतःच्या कमकुवतपणामुळे प्रगती करु देत नाही; असे काही मित्र तुमच्या अवतीभवती आहेत काय?

काही जण, श्रीमंत मित्रमैत्रिणींना जाणीवपूर्वक चिकटलेले असतात.

काही मित्रमैत्रिणींची भूमिका असते, 'हम तो डुबेंगे सनम, तुमको भी साथ ले डुबेंगे|'

काही जण, स्वतःच्या न्यूनगंडापोटी आपल्या मित्रमंडळींना प्रगती करु देत नाहीत. मग, ते कान भरण्याचे काम करत राहतात. भिती निर्माण करतात.

उंचच खांबावर चढण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना, प्रेक्षकांतील अनेक जण नाउमेद करत होते. त्यांचे नकारात्मक बोलणे व खोचक टोमण्यांनी, निराश होऊन, एक वगळता, सर्व स्पर्धक खाली उतरले. खाली न उतरलेला स्पर्धक, शेवटपर्यंत वर चढून स्पर्धा जिंकला. नंतर समजले की, तो बहिरा होता.

कित्येकदा, तुमच्यामध्ये क्षमता व समोर संधी असूनसुद्धा, तुम्हाला प्रगती पासून मागे खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसोबत असताना, नाउमेद करणाऱ्या शब्द ऐकताना बहिरे बनणे व दुर्लक्ष करणे, योग्य!

चांगले मित्रमैत्रिणी एकत्र आले तर प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले योगदान झाले पाहिजे. कमीत कमी, कुणाचेही वाईट न होता, चांगला वेळ एकमेकांच्या सहवासात घालवता आला पाहिजे.

अन्यथा, ऐकावे मित्रांचे, करावे तारतम्याने मनाचे!

आपलाच,

बिपिन मयेकर

Comments

Popular posts from this blog

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

आजार, आधार आणि दृष्टिकोन