ही कोण?

 "काय रे, कोण?"

एका संध्याकाळी रात्री घरी परत येत असताना वाटेत थांबून मोठ्या भावाच्या मित्राने प्रश्न विचारला. 

मला कळले नाही. मी विचारले, "कोण?" 

तेव्हा त्याने डोळे मिचकावत विचारले, "अरे, स्टेशनवर दररोज अर्धा एक तास गप्पा मारत असतोस, ती कोण?" 

मी सहज उत्तर दिले, "मैत्रीण आहे!" 

त्यावर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून दबक्या आवाजात विचारले, "बिपिन, अशी कोणती ही मैत्रीण आहे, जिच्या बरोबर तुझ्या इतक्या गप्पा रंगतात?

मी शांतपणे सांगितले, "माझे असे मित्र सुद्धा आहेत आणि अजून मैत्रिणी सुद्धा आहेत; त्यांच्यासोबत माझे विचार जुळतात, आवडी-निवडी जुळतात आणि मग त्यांच्याशी मी तासन-तास गप्पा मारू शकतो. हो, आणि स्टेशन वर सुद्धा!"

मोठ्या भावाचा मित्र खांदे उडवत जाताना म्हणाला, "आम्ही फक्त बसल्यावरच (🥃), आमच्या गप्पा रंगतात.."

मूलभूत स्त्री पुरुष मैत्रिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी वेगळा होताच, पण आता तो एका बाजूने अधिक मलिन होत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूने तो दृष्टिकोन सुदृढ दृष्ट्या स्वच्छ होत चालला आहे. तरी, निकोप दृष्टिकोन असणाऱ्यांचे प्रमाण कमी असावे.

शाळेत असताना, मुलांना गृहपाठ न केल्यास किंवा मस्ती केल्यावर, मुलींच्या बाकावर त्यांच्यासोबत बसण्याची शिक्षा मिळत होती. ही शिक्षा मिळणे, मुलांना आवडत नव्हते. मुलींबरोबर मैत्री असली तरी, त्यांच्या मध्ये जाऊन बसणे, बहुतेक मुलांना खचितच आवडणारे नव्हते. पण तरीही मस्ती करताना मुलं-मुली हा भेद नव्हता, निखळ मैत्री होती. 

नंतर कॉलेजमध्ये गेल्यावरही, खास करून डिग्री कॉलेजमध्ये असताना, खूप छान मित्रमैत्रिणी लाभले होते व मोजके मित्र आजही एकत्र आहेत. एक मैत्रिण, खूप वर्षांनी भेटली. तिला लग्नानंतर न भेटण्याचे कारण विचारले. तिने सावध उत्तर दिले, "You know Bipin, how it is after marriage.." मी हसत म्हणालो, "I really don't know. माझी पत्नी, आजही जेव्हा शक्य असेल, तेव्हा तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींना भेटते." असो.

तेव्हा कॉलेजमध्ये या मित्र-मैत्रिणींबरोबर खूप चांगल्या गप्पा रंगत होत्या. कितेकदा चित्रपट बघायला आम्ही मित्र मैत्रिणी एकत्र जात असू बसताना सुद्धा मुली एकत्र किंवा मुले एकत्र असा प्रकार नसे. माझी एक मैत्रीण चित्रपट बघताना कंटाळा आला तर सरळ माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपत असे. त्यात आम्हाला दोघांनाही कुठेही वावगे वाटत नव्हते.

कॉलेजमध्ये, माझ्या बरोबर असणारी एक दुसरी मैत्रिण, एकदा ढसाढसा रडत होती. मी गेलो, तेव्हा इतर मित्रमैत्रिणी तिला समजावत होते. मी विचारले असता, मला समजले की, दुसर्‍या ग्रुप मधल्या मुलांनी माझ्यावरुन तिला चिडवले होते.

ती खूप संवेदनशील होती. त्यामुळे आम्हाला तिला समजवायला थोडा वेळ लागला. पण नंतर ती शांत झाली. मग आमच्या ग्रुपमधील मुलांनी, दुसऱ्या ग्रुप मधील मुलांशी चर्चा केली. त्या ग्रुपमध्ये एकही मुलगी नव्हती. त्यामुळे त्या ग्रुप मधील एक दोघा जणांना आकस वाटत होता. जेव्हा त्यांना आमच्या ग्रुप बरोबर मैत्री करण्यासाठी बोलावले, आणि तेव्हा त्यांना मुलींशी बोलायची संधी मिळाली. त्यांना मुला-मुलींमधील मैत्रीचा खरा अर्थ सुद्धा समजला होता.

कॉलेजमध्ये असतानाच आम्ही काहीजण क्लासेस साठी बाहेर जात होतो. तेथून येत असताना, एकदा आम्ही मित्र मैत्रिणी बसस्टॉपवर उभे होतो. इतरांची बस आल्या; मी आणि एक मैत्रीण वगळता, सगळेजण आपापल्या घरी निघून गेले होते. माझी बस आली की, मी बाय म्हणून बस पकडायला पुढे जात असे. पण बस प्रत्येक वेळेस न थांबता निघून जात होती. 

मैत्रिणीची बस येतच नव्हती. इतक्यात तिची बस आली व ती पुढे झाली. पण तिची बस ही न थांबताच, गर्दी असल्यामुळे निघून गेली. त्यामुळे आमच्या दोघांचाही हास्याचा स्फोट झाला आणि आम्ही एकमेकांना टाळ्या देत जोरजोरात खोखो हसत होतो. काही मिनिटातच तिची बस आली व ती बस नशिबाने थांबली आणि माझी मैत्रीण तिच्या घरी निघून गेली. तिला बाय करत असतानाच माझा कॉलनी मधील एक मित्र धावत येताना दिसला. 

मी त्याला विचारलं, "तू इथे काय करतोयस? इतका धावतोय कशाला?" त्यावर त्याने चमत्कारिक उत्तर दिले. त्याने सांगितले, तो बसमधून जात असताना त्याने मला एका मुलीबरोबर टाळी देत हसताना पाहिले. त्यामुळे त्याचे कुतूहल निर्माण झाले, "ही कोण?" 

आणि ते उत्तर शोधायला, तो पुढच्या स्टॉपवर उतरुन, या मागच्या स्टॉप पर्यंत धावत आला होता. मी त्याच्या समोरच कपाळावर हात टेकवला. आणि त्याला समजावून सांगितले की, ती केवळ मैत्रीण आहे. पण नंतर बसमधून घरी येईपर्यंत त्याला माझे म्हणणे पटत नव्हते.

असे, अनेक अनुभव आपल्याला सुध्दा आले असतील. कावीळ झालेल्या व्यक्तीला, सगळीकडे पिवळेच दिसते.. या उक्तीप्रमाणे, अनेक जणांना, स्त्री-पुरुषांना एकत्र बघितले की, वेगळाच विचार येतो.

माझ्या मित्राने मला यावर छेडले होते की, तू ज्याला दुसरा विचार म्हणतो, तो प्रकार सुद्धा असू शकतो. माझ्या मते, वास्तववादी दृष्टिकोनातून, ते दोन्ही स्त्री-पुरुष सज्ञान असतील, तर त्यांच्या नात्यांना काय अर्थ द्यायचा, याचा निर्णय त्या दोघांनी घ्यायचा असतो. त्यात इतरांनी ढवळाढवळ करायची काही गरज नसते; खास करून काहीही संबंध नसलेल्यांनी..

पराकोटीची भिती, चिंता, द्वेष, रोगट पूर्वग्रह असतील तर वास्तववादी दृष्टिकोन स्विकारता येत नाही. 

एक चांगली मैत्री; वय, रंगरुप, पेहराव, खरी श्रीमंती स्त्री-पुरुष इत्यादी भेदभाव मानत नाही. जिथे विचार जुळतात, आवडी-निवडी समजून घेतल्या जातात व एकमेकांचे स्वभाव बऱ्यापैकी मान्य असतात; तेथे मैत्री रुजते.

बिपिन मयेकर

७०२१५०८४७०

Comments

Popular posts from this blog

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

आजार, आधार आणि दृष्टिकोन