मैत्रीत राजकारण नको, राजकारणात मैत्री करा.

 .

.

"मैत्रीत राजकारण नको. राजकारणात मैत्री करा."

राजकीय सल्लागार' होण्यासाठी ज्यांनी मला मार्गदर्शन केले, त्यांनी मला हा सल्ला दिला होता.


आज जवळच्या नात्यांमध्ये मित्र-मैत्रिणी मध्ये राजकारणातील स्वतःच्या मतांबद्दल अट्टाहास धरला जात आहे; दुराग्रह केला जात आहे. कित्येकदा हे पक्षीय राजकारण असतं, तर कधी धर्माचं किंवा जातीचं राजकारण असतं..


लहानपणी, आम्हां मित्रमैत्रिणींना, 'जात' माहित नव्हती; 'धर्म' चर्चेत नव्हता.


आज चित्र थोडेफार का होईना, बदलत चालले आहे.

आज, लहानपणी ज्यांनी घट्ट मैत्रीमध्ये, जातीधर्माचा विचार केला नव्हता, त्याच मित्रमैत्रिणींमध्ये, जातीनुसार किंवा अहंकाराच्या पार्श्वभूमीवर ग्रुप्स बनत गेले आहेत. तर इतर सामाजिक मित्रमैत्रिणींमध्ये, आपापल्या धर्मावरुन (केवळ हिंदू नव्हे) आग्रही भूमिका घेणे, सुरु झाले आहे. यावर, वॉट्सॲप युनिव्हर्सिटी व राजकारणाची गडद छाप जाणवते. 


मैत्रीमध्ये राजकीय पक्षांच्या धोरणांचे पडसाद उमटत आहेत. आज आबालवृद्ध सर्वांनीच विचार करायला हवा, की आपण जी मते सोशल मिडियामध्ये व्यक्त करता, त्यांचा आपल्याकडे स्वतःचा तर्कशुद्ध आधार आहे काय की, आपण राजकीय सारीपाटावर, प्यादे म्हणून वापरले जात आहोत? किंवा व्यक्त व्हायला सोशल मिडिया लाभला आहे, म्हणून कोणताही विचार न करता, फॉरवर्ड करत आहोत, किंवा माफ करा, पण कॉपी_पेस्ट किंवा आलं ते ढकलले (फॉरवर्ड केलं), हा स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी केलेला प्रयत्न आहे?


धोका हा आहे की, विचार न करता, वाचलेले स्विकारणारे किंवा शिष्टाचार तसेच विनम्रतेची मर्यादा नसलेले, अनेक जण वाटेल तसे व्यक्त होत आहेत. त्यांना समजावणे कठीण असते, कारण कदाचित तितके तारतम्य त्यांच्याकडे नसावे. ही अनोळखी माणसे असतात.


पण कित्येकदा ओळखीच्या व्यक्तींमध्ये सुद्धा मर्यादा येतात. पूर्वी, सकारात्मक नसलेली पोस्ट आली की, मी समोरील नात्यातील व्यक्तीला किंवा मित्रमैत्रिणींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो किंवा प्रश्न विचारत होतो. पण, लक्षात आले की, बरेच वेळेस, ते पालथ्या घड्यावर पाणी होते, किंवा समोरची व्यक्ती त्यातून वेगळाच अर्थ काढते. काही जण तर नात्याचा विचार न करता, टोक गाठतात.. काही जण, पाठीमागे गॉसिप करतात. 


बहुतेक वेळा, सोशल मिडियाच्या जाळ्यात सहज अडकले जाणारे मित्रमैत्रिणी अथवा नातलग, खऱ्या अर्थाने साधे आहेत. पण, ते राजकीय धोरणांच्या आहारी जात आहेत. या मूलभूत साधेपणा अंगी असणाऱ्या, मित्रमैत्रिणींनी सावध असणे, आवश्यक आहे.


राजकीय भूमिका असायला हवी. जो देशाच्या वा समाजाच्या विरुद्ध कृती करत असेल; तर तो कोणत्याही जातीधर्माचा असेल, त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण, मग त्यात स्वतःच्या जातीधर्माच्या बाबतीत, कोणाचेही सोयीस्कर दुर्लक्ष नको. अन्याय झाला होता, म्हणून अन्याय करण्याचा बहाणा नको. राष्ट्रपुरुषांना, जातीच्या आवरणात कवटाळून, त्यांच्या कर्तृत्वाचा अवमान नको.


खरा राष्ट्रभक्त चुकीच्या देशद्रोही कृतींवर आघात करेलच, पण स्वतःच्या कृतीतून स्वतःची राष्ट्रभक्ती अगोदर सिद्ध करेल. आपण जे योग्य काम (नोकरी/व्यवसाय) करतो, ते प्रत्येकाने इमानेइतबारे व उच्च दर्जाचे केले तरी ती खरी राष्ट्रभक्ती असेल.


सीमेवर जीवाची बाजी लावून लढणारे सैनिक, ही जबाबदारी पार पाडत आहेत. इमानेइतबारे आपापले सामाजिक, राजकीय व व्यावसायिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. आपण काय करत आहोत?


राष्ट्रभक्ती व मैत्री, यांची खरी व्याख्या लक्षात ठेवून, तसे वर्तन व संवाद, करु या.


अगोदर, राष्ट्रभक्तीची जबाबदारी घेऊ या, मग हक्क घेऊ या..


बिपिन मयेकर

लेखक

Comments

Popular posts from this blog

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

आजार, आधार आणि दृष्टिकोन