निरागसपणा, कितपत असावा?


आमच्या कुटुंबाची पालकत्वाच्या नात्याने काळजी घेणारे, माझे वरिष्ठ मित्र, यांनी हल्लीच निरागसतेवरुन मस्करी केली. मी हसत हसत उत्तर दिले, "मी निरागस नाही."

माझ्या पत्नीने नंतर विचारले, "तुम्ही असं कशासाठी बोललात?"

माझ्या मते, 'निरागस म्हणजे ज्याला काही कळत नाही.. याउलट, मला Subconscious Mind Reader म्हणून समोरच्या व्यक्तीचे हेतू व भावना समजतात. म्हणून मी निरागस नाही. हो, पण, मी समोरील व्यक्तीच्या मनातील ओळखले, तरी मी त्याचा कधीच फायदा घेतला नाही, उलट काही वेळा माझा फायदा घेऊ दिला. पण, त्याची जबाबदारी माझीच होती व आहे. ते माझे निर्णय होते व ती माझी प्राथमिकता होती. आपल्या निर्णयांना व प्राथमिकतांना, आपणच जबाबदार असतो. 


माझ्या आयुष्यावर, अनेक मोठ्या व्यक्तींचा प्रभाव आहे. माझ्या एका प्रभावी व आवडत्या लेखकांनी (आज ते हयात नाहीत), त्यांच्या वडिलांबद्दल सांगितले होते. "त्यांच्या वडिलांना, अनेक जण फसवत होते. एकदा, वडिलांच्या मित्राने विचारले, इतके जण, तुमचा हवा तेव्हा, हवा तसा फायदा घेतात. त्यातील काही जण तुम्हाला फसवतात, तुम्हाला वाईट नाही वाटत? वडिलांनी उत्तर दिले, "मला माहित नसताना फसवले व नंतर मला कळले तर वाईट वाटू शकते. मला तर बहुतेक वेळा फायदा उचलण्याच्या वा फसवले जाण्याच्या अगोदर माहित असते, तरीही जितकं मी सहन करु शकतो, तितका मी स्वतःचा फायदा उचलू देतो, किंवा फसवून घेतो."


आपल्या आयुष्यासाठी, संपूर्ण दोष दुसऱ्याला देणारे स्वावलंबी नसण्याची शक्यता असते.


मी अतिजास्त विश्लेषण करण्याबद्दल बोलत नाही. पण, सर्वसाधारणपणे चौकस असणे, आजच्या काळात आवश्यक आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल व स्वतःबद्दल सुद्धा..


इंग्लंडमध्ये, बेंजामिन डेझरायली, नावाचे प्रख्यात नेते होऊन गेले. असं सांगितलं जातं की, ते खूप साधे होते. एकदा त्यांची बायको त्यांना साधेपणावरुन प्रचंड टोमणे मारत होती. तेव्हा त्यांनी तिला ठामपणे सांगितले, "Mind you, you are speaking to tomorrow's Prime Minister.."

त्यांच्या आत्मविश्वासाने व शब्दांमधील ठामपणामुळे, त्यांची पत्नी जागीच अवाक झाली. तिच्या म्हणण्यानुसार, तिला त्यांचे म्हणणे पटले होते.


बेंजामिन डेझरायली साधारणपणे ३० वर्षे संसदेत होते. त्यातील काही वर्षे ते पंतप्रधान व विरोधी पक्षनेते होते.


बेंजामिन डेझरायली, यांच्याप्रमाणेच आपल्या साधेपणाला; इतर गुणांसह, आत्मविश्वास, चौकस बुद्धी व ठामपणाची जोड हवी.


साधेपणाची वेगळी बाजू म्हणजे सर्वसाधारणपणे, साधेपणाला गृहित धरले जाते. पण, दुसरी बाजू म्हणजे आपल्याला कमी लेखण्याच्या अतिआत्मविश्वासातून, त्या व्यक्तीचे खरं रुप उघड होण्याची शक्यता जास्त असते.


साध्या व्यक्तीच्या सुद्धा अपेक्षा असतात, याचा समोरुन विचार न होणे, असे बहुतेक वेळा घडत असते. आणि, अशा वेळी, योग्य ठामपणा वापरला नाही तर, न्याय न मिळण्याची शक्यता असते. 


मी माझ्या लेखणीतून व व्याख्यानातून, सतत उल्लेख केल्याप्रमाणे,

तुमच्या इतरांकडून असलेल्या अपेक्षा, तुमचे हक्क असतात, तर

इतरांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा, या तुमच्या जबाबदाऱ्या असतात.


रास्त जबाबदाऱ्या स्विकारायला हव्यात, पण रास्त हक्कांची सुद्धा जाणीव हवी.


स्वार्थी वा स्वकेंद्रित व्यक्तींकडून,केवळ फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. तर, मिळमिळीत व्यक्ती, नाईलाजाने व न्यूनगंडापोटी त्यांचा फायदा घेऊ देतात. पण, समंजस व्यक्ती, समोरील व्यक्तीचा कळत नकळत का होईना, शक्य त्या मर्यादेत फायदा करवून देतात.


फक्त लक्षात ठेवायला हवे की, समजूतदारपणाला अतिजास्त प्रमाणात गृहित धरायला सुरुवात झाली की, समजूतदारपणेच ठामपणा वापरायला हवा.


जवळचे मित्रमैत्रिणी किंवा नातलग, अपरोक्ष चुकीचे वागत असतील तर, अगोदर चर्चा करणे वा अप्रत्यक्ष रितीने समजावणे आवश्यक असते. कारण सरळ चर्चा करायला यातील अनेक जण तयार नसतात. सरळ मार्गांचा उपयोग होत नसेल; तसेच, ती व्यक्ती प्रिय आणि जवळची असेल तर, सकारात्मकतेने दूर होणे, चांगले..


निरागसपणाला, बावळटपणा होऊ न देता, चांगुलपणाला व समजूतदारपणाला, योग्य ठामपणाची जोड देऊ या.


आपलाच,

बिपिन मयेकर

नातेसंबंध मार्गदर्शक



Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?