स्त्री_पुरुष

 माझी मते:


काही वर्षांपूर्वी, मी जिन्यावरुन धावत खाली प्लॅटफॉर्मवर येऊन, नुकतीच सुरु झालेली ट्रेन पकडली. थोडा श्वास घेतल्यानंतर, लक्षात आले की, मी महिलांच्या बाजूच्या डब्यात होतो. मध्येच जी जाळी होती, तिथे काही पुरुष बांधव आपल्या डोळ्यांचे कॅमेरे लावून उभे होते. महत्वाची बाब म्हणजे, तो रक्षाबंधनाचा दिवस होता. बहुतेक सर्वांच्या हातावर राखी बांधलेली होती.


मी दरवाजाजवळ उभा राहिलो. उतरणाऱ्या कॅमेरा लावून बघणाऱ्या पुरुषांबद्दल एक अपेक्षा होती की, त्यांची बहीण बाजूच्या डब्यात होती, म्हणून ते काळजीपोटी तेथे उभे होते.


पण मी उतरेपर्यंत, एकाही पुरुषाला बाजूच्या डब्यातील मुलगी वा स्त्री भेटली नाही.


याचा अर्थ, सर्व पुरुष असे आहेत व कोणतीही मुलगी अथवा स्त्री, अशी नाही; असा होत नाही. यातही आता स्पर्धा सुरु झाली आहे. अर्थात अजून तरी पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.


मी नाशिक येथे 'महाराष्ट्र पोलीस' दलातील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण घ्यायला गेलो होतो, तेव्हा दोन तरुण महिला ट्रेनर्स मला भेटायला आल्या होत्या.


थोड्या गप्पा झाल्यानंतर, त्यांनी मला एक प्रश्न विचारला, "सर, sex म्हणताच तुमच्या मनात कोणता विचार येतो.?"


दुसऱ्या सेकंदाला माझे उत्तर होते, "gender"


त्या दोघींनी हसून सांगितले, "खरं आहे. पण हे उत्तर आम्हाला शक्यतो मिळतच नाही. आम्ही असा प्रश्न, तोही आम्ही मुलींनी विचारल्यावर, अनेक जण बावरतात. काही वयस्कर माणसे सल्ला देतात, मुलींना असे प्रश्न विचारणे, शोभत नाही."


आज अशी निर्भिडपणे चर्चा किती जण करु शकतात?


ज्या देशात - राज्यात, अजिंठा वेरुळ सारखी लेणी घडवली गेली, त्या घडवणाऱ्यांचा दृष्टिकोन कसा होता असेल?


मग, आजचा दूषित दृष्टिकोन कसा तयार होत गेला, वाढत गेला?


'शरीराविषयक अनावश्यक आकर्षण, हे कशामुळे तयार होत असावे?'


मुलांच्या संगोपनामध्ये तर उत्तरे दडलेली नाहीत ना?


अज्ञानापोटी असलेल्या उत्सुकतेला, तितकेच किंबहुना जास्त अज्ञानी मित्र चुकीची दिशा देतात. त्या भावनेला, उत्तान दृश्य दाखवणारे चित्रपट व सिरिअल्स, अजून बढावा देतात. सोशल मीडियावर देवाणघेवाण होते. आणि उत्सुकतेने चुकीचा हमरस्ता पकडलेला असतो.


Criminal psychology नुसार, गुन्हेगार दृष्टिकोन criminal attitude व गुन्ह्याची संधी criminal opportunity एकत्र आले, तर गुन्हा घडतो. नुसता गुन्हेगारीचा दृष्टिकोन असेल, तरी गुन्ह्याची संधी निर्माण केली जाते. पण गुन्हेगार दृष्टिकोन नसेल, तर संधी असूनही गुन्हा घडत नाही.


तसेच, इथे म्हणतां येईल. मूलभूत स्त्रियांच्या शरीरासंबंधी असलेला दृष्टिकोनच सुधारला गेला पाहिजे. स्त्रियांचे शरीर व संभोग, याकडे बघण्याची वास्तव विचारसरणी स्विकारता आली, तर मग अश्लील साहित्य व अश्लील चित्रीकरण यांवर स्वतःहून निर्बंध येऊ शकतात.


कठीण आहे, पण अशक्य नाही..


'साथ साथ' नावाच्या चित्रपटात अविनाश (फारुक शेख) तत्त्वप्रिय तरुण दाखवला आहे. त्याच्या या तत्त्वांवर भाळून गीता (दिप्ती नवल) ही श्रीमंताघरची मुलगी त्याच्याशी, घरच्यांचा विरोध पत्करुन लग्न करते.


परंतु काही महिन्यांतच, तत्त्वांमुळे होणारा त्रास अर्थात आर्थिक त्रास सहन न झाल्यामुळे अविनाश (फारुक शेख) आपल्या मित्राबरोबर, प्रिंटिंगच्या व्यवसायात, अश्लिल साहित्य निर्माण करायचं ठरवतो. त्याला व त्याच्या मित्राला खात्री असते, यातून बक्कळ पैसा मिळेल.. 


परंतु हे जेव्हा गीता (दिप्ती नवल) या त्याच्या पत्नीला समजते, तेव्हा ती आपल्या नवऱ्याला सोडून जायचे ठरवते. 


ती नवऱ्याला विचारते, "एखादा गुन्हा करणारा माणूस, एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला वा संस्थेला हानी पोहोचवत असतो. पण तू तर, एका अख्ख्या पिढीला हानी पोहोचवणार आहेस." 


यावर अविनाशचे डोळे उघडतात.

आपल्या पत्नी गीतावर अतोनात प्रेम असणारा अविनाश (फारुक शेख) मग आपला तो यलो साहित्याचा विचार बदलतो.


पूर्ण समुद्र (जग) स्वच्छ करता येत नसेल तर तुरटी घेऊन स्वतःभोवती असलेले पाणी (परिस्थिती) स्वच्छ करु या.


तुमचं मत काय आहे?

आपलाच,

#बिपिनमयेकर 

#BipinMayekar #स्त्रीपुरुष #वास्तवविचारसरणी

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?