Thank you जिंदगी!



तुमच्या लहानपणी तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे रहायला जात होता काय? मामाच्या घरी किंवा काका/मावशीच्या घरी?
तुमचा काय अनुभव होता?

माझ्या वारकरी' सासूबाईंनी मला एकदा प्रश्न विचारला.

मी लहानपणी मावशीकडे रहायला जात होतो, ते आनंदाचे क्षण सांगितले. आपल्या लहानपणीच्या या आठवणी खूप सुखावह असतात.

लहानपणी मामा/काका/मावशीच्या घरी रहायला गेलो असता, तिथे आपल्या वागण्याबोलण्यामध्ये परकेपणा नव्हता. आपुलकी होती, विश्वास होता. भूक लागली तर उपलब्ध असलेल्या चांगल्या पर्यायांपैकी चांगले खायला मागितले. झोप आली तर झोपलो. आवश्यक ती कामे सुद्धा आत्मीयतेने केली होती.

त्या घरात एखादी दुर्घटना घडली (एखादी भिंत कोसळली वा वस्तू पडून फुटली) तर आपल्याला सुद्धा वाईट वाटत असे. पण आपल्या नातेवाईकांना जितके वाईट वाटले असेल तितके वाईट वाटले नसेल.
एखादी चांगली घटना घडली तर आनंद झाला असेल पण त्या नातेवाईकांना झाला त्या प्रमाणात आनंद झाला नसेल.

कारण कुठेतरी जाणीव असते - मी इथे तात्पुरता राहायला आलो आहे, हे सर्व सोडून मला जायचे आहे.

मग या भौतिक जगाचे सुद्धा तसेच आहे. आपण इथे तात्पुरते राहायला आलो आहोत. त्यामुळे हे जीवन जगताना सुद्धा परकेपणा नको तसेच अतिरिक्त आसक्ती पण नको. समरसून जगताना सुद्धा अलिप्तपणा (हे सर्व सोडून मला जायचे आहे) ही जाणीव असेल, तर जगण्याला अर्थ प्राप्त करुन देता येतो.

लहानपणी आपण परत आल्यावर मामा/काका/मावशीच्या घरी आपली आठवण काढली जात असे. आपल्या तेथील वास्तव्यामध्ये आपले ज्या पद्धतीने वागणेबोलणे होते, त्यावरुन आपली आठवण काढली जात असे.

वयाची पन्नाशी गाठताना, प्रत्येक दशकातील, अशा अनेक आठवणींची शिदोरी गाठीशी आहे. पुढील दशकांमध्ये याच अनुभवांच्या शिदोरीचा खरा उपयोग होणार आहे.
Thank you जिंदगी!

प्रसन्न *बिपीन मयेकर*

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?