व्हॅलेंटाईन डे/आठवडा

 


प्रेम 


काल चालतानाचा अनुभव:

नेहमीप्रमाणे संध्याकाळी सांगण्यासाठी गेलो असताना, एका ठराविक ठिकाणी, जिथे तरुण वर्ग बसून गप्पा मारत असतात, तिथे थोड्या अंतरावरुन लक्ष गेले. तीन टिनेजर मित्र, (साधारण सतरा-अठरा वयाचे असावेत) एकत्र बसून जोरजोरात हसत खिदळत होते. त्यांचा हास्यकल्लोळ मला लांबून ऐकू येत होता व त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य दिसत होते.

इतक्यात दुसऱ्या बाजूने, त्यांच्याच वयाचे जोडपे येताना दिसले. त्यांच्यापाठोपाठ दुसरे जोडपे होते. त्या तरुण मुला-मुलींना एकत्र पाहून या तीन मित्रांच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळले. ती मुले शांत झालेली दिसत होती.

मी जेव्हा त्यांच्या बाजूने पास झालो तेव्हा त्यांच्याशी चर्चा सुरू होती, "काय यार, आज आपल्या प्रत्येकाबरोबर कुणीच मुलगी नाही."

पण, त्याअगोदर माझ्या बाजूने जे टिनेजर जोडपे निघून गेले, त्यांच्यात वादविवाद सुरु होता. त्याला अहंकाराची झालर असावी, दोघांच्याही कडून.. दुसरे जोडपे पास झाले; तेव्हा लक्षात आले, यांच्यामध्ये फक्त मैत्री आहे. ती दोघे शांतपणे गप्पा मारत निघून गेले.

तिघेही आरामात हसत खेळत होते, परंतु समोरुन जाणार्‍या जोडप्यांना पाहून, त्यांच्यात उगाचच न्यूनगंड निर्माण झाला होता. 'आपल्याबरोबर एकही मुलगी व्हॅलेंटाईन वीक मध्ये सोबत नाही', याचं त्यांना वैषम्य वाटत होतं. पण हे खरोखरच आवश्यक आहे काय?

त्यांचा चांगला चाललेला वेळ, केवळ या तुलनात्मक विचारांनी वेगळ्या वाटेवर गेला होता. व्हॅलेंटाईन डे व आठवडा; म्हटलं तर कोणत्याही जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाच्या बाबतीत व्यक्त होण्याचे साधन होऊ शकतो, किंवा पद्धतशीर मार्केटिंगची शिकार होऊ शकतो.

खरं तर फक्त व्हॅलेंटाईन डे, हा संत व्हॅलेंटाईन यांच्या नावाने साजरा केला जात होता. परंतु नंतर नवरात्रीतील रंगाप्रमाणे, व्यावसायिकांनी मार्केटिंग तत्रांचा उपयोग करुन, याचा कब्जा घेतला व पूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा होऊ लागला.

ठीक आहे, सकारात्मकपणे त्याच्यातून चांगले करता येऊ शकते. फक्त लक्षात ठेवायला हवे, संत व्हॅलेंटाईन यांचा संदेश, केवळ जोडप्यांसाठी नव्हता, तर सर्व प्रकारच्या प्रेमासाठी होता. मित्रमैत्रिणी, आई-वडील, भाऊबहिणी, तुमची काळजी घेणारे नातलग वा जवळची माणसे, या सर्वांसाठी आहे; असे म्हणतात.

तुमचे प्रेम चुकीचे नसेल, पण समोरील व्यक्ती वा परिस्थिती वेगळी असू शकते. चुकीच्या निर्णयामुळे, तुमच्या आयुष्यातील चांगल्या माणसांना गमावू नका.

मध्यंतरी एक चांगला विचार वॉट्सॲप मेसेज मध्ये आला होता,
आपली काळजी करणाऱ्या माणसांना गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..

अशा व्यक्ती, तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना जपून ठेवा.

परंतु, सध्या व्हॅलेंटाईन साजरा करण्याला, वेगळे वळण मिळाले आहे. हा फक्त तरुण-तरुणी जोडप्यांचा इव्हेंट बनला आहे.

वयोमानानुसार, हार्मोनल बदलांमुळे, आकर्षण निर्माण होणे, नैसर्गिक असू शकते. पण, त्याला लगेच प्रेमाचे नाव देणे, योग्य आहे काय?

न कळत्या वयात, प्रेम, हे आकर्षण असू शकते. कमीत कमी, काही वर्षे हे टिकले तर ते केवळ आकर्षण नाही, असे म्हणू शकतो. दुसऱ्यावर प्रेम करण्याअगोदर, स्वतःवर योग्य स्वरुपात व योग्य प्रमाणात, प्रेम असायला हवे. अन्यथा, ज्याला तुम्ही प्रेम समजता, ते तुम्हाला परावलंबी करते.. तुम्हाला दुबळे करते.. खऱ्या प्रेमामध्ये, दुसऱ्यावर हक्क गाजवण्याआधी, स्वतःच्या जबाबदाऱ्या उचलणे, आवश्यक असते.

कुणीतरी प्रॅक्टिकली म्हटलं आहे, सध्याच्या काळात
फक्त प्रेमाने पोट भरता येत नाही.
ब्रेकफास्ट, लंच व डिनर सुद्धा लागते,
ते सुद्धा स्वादिष्ट, चांगल्या वातावरणात...

कित्येक तरुणाईसाठी,
प्रेम ही प्रक्रिया आहे.
लग्न हे ध्येय आहे.
पण, त्यांनी लक्षात ठेवायला हवे,
प्रेमाची खरी कसोटी लग्नानंतर असते.

आकर्षण असेल, तर त्याचा रंग काही दिवसांत उडून जातो. जबाबदाऱ्यांशिवाय केलेल्या प्रेमाचा रंग, आव्हानात्मक प्रसंगात उडून जाऊ शकतो.

तसेच, लग्नाच्या पूर्वी, रक्तगट व स्वभाव, दोघांचीही चाचणी आवश्यक असते. आज अनेक जण, लग्नापूर्वी Blood Cell Compatibility Table चेक करतात.

लग्नाअगोदर अर्ध्या एक तासासाठी बाहेर भेटणे, हे सोपे आहे. कारण तेथे फक्त बाह्य स्वरुपच लक्षात येते. स्वतःची केवळ चांगली बाजू समोर ठेवली जाऊ शकते. परंतु लग्नानंतर, अगोदर लपवले गेलेले किंवा झाकले गेलेले दोष बाहेर येऊ शकतात. मग हळूहळू तक्रारी व वाद-विवाद याची सुरुवात होते.

आज कोर्टामध्ये तरुण जोडप्यांचे घटस्फोटांचे प्रमाण खूप जास्त आहे. या सगळ्यांकडे, तरुणाईने डोळसपणे बघण्याची गरज आहे.

आज काही अंशी तरुण-तरुणी, ही लिव्ह-इन स्वरुपात राहत आहेत. त्याचे सुद्धा त्यांनी चौकस बुद्धीने विश्लेषण करायला हवे. ते बरोबर किंवा चूक हे ठरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे, पण तेवढीच, त्यांच्या येऊ घातलेल्या भविष्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच आहे. ती जबाबदारी ते नाकारु शकत नाहीत. त्यांच्या होणाऱ्या मुलांची जबाबदारी, किंवा मुले नको असतील तर त्याचे उत्तरदायित्व, म्हातारपणी स्वबळावर उभे राहण्याची जबाबदारी, किंवा एकमेकांना सांभाळण्याची जबाबदारी; या सर्वांचा विचार त्यांनी करायला हवा. याच बाबी, त्याच किंवा थोड्या वेगळ्या स्वरुपात, लग्न न करण्याचा निर्णय घेणाऱ्यांना लागू होऊ शकतात.

खरं तर, लग्न हा जोडप्यातील दोघांसाठी एका प्रकारे, पुनर्जन्म असतो. कारण लग्नानंतर त्यांचे आयुष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. त्यामुळे, भावनेच्या भरात, जर निवड चुकीची झाली, तर पुढे आयुष्यभर त्यांना पस्तावत राहावे लागते. काहीजण घटस्फोटाचा पर्याय निवडतात. काहीजण त्यानंतर दुसरे लग्न करतात. तर काही कष्टाने संसार रेटत राहतात.

पोस्टमार्टम करण्याऐवजी, चिकित्सा केलेली कधीही चांगली!

त्यामुळे लग्न हा केवळ भावनात्मक निर्णय न राहता, त्याला थोडीफार तर्कशास्त्राची सुद्धा जोड हवी.

अत्यंत मोजके जण, plutonic love (अर्थात एक असे प्रेम, जे निर्मळ भावनेने, कोणत्याही अटींशिवाय, कोणत्याही शारिरीक आकर्षणाशिवाय व केवळ समोरील व्यक्तीच्या भल्यासाठी असते) या भावनेने प्रेरित असतात.

माझ्या कॉलेजमध्ये एक मित्र होता, अजूनही आहे. एक अत्यंत सुंदर व श्रीमंत मुलगी त्याच्या प्रेमात पडली होती. त्याला सुद्धा ती मुलगी प्रचंड आवडत होती. ती मुलगी त्याला बघून खुदकन हसायची.. लाजायची.. हळूहळू दोघे बोलू लागले.. भेटू लागले. पण, या मित्राने तिला कधीच प्रपोज केले नाही..

मला हे कळताच, जेव्हा मी त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा त्याचे उत्तर ऐकून मी हबकून गेलो होतो. त्याचे म्हणणे होते, "मला वास्तवाची जाणीव आहे. ती जितकी सुंदर आहे, त्याच्या कैक पटीने ती श्रीमंत आहे. सुट्टीच्या दिवसात, मी जेव्हा ट्रेनने गावी जातो, तेव्हा ती विमानाने लंडन, न्यूयॉर्क, पॅरिस असे देश फिरत असते.
आज तिच्या गरजा तिचे पालक पूर्ण करत आहेत. पण, लग्नानंतर काय? माझा स्वाभिमान व तिच्या सवयी, यांत खटके उडू शकतात.
आमच्या होणाऱ्या मुलांचे काय? जशी ती लहानाची मोठी झाली, तशीच अपेक्षा, तिला तिच्या मुलांसाठी असणार व असायलाच हव्या. मग, काय करायचं?
माझी आई कशी आहे, हे तुला सुद्धा माहित आहे. माझ्यावर तिचे खूप प्रेम आहे, पण तिचा स्वभाव, सून म्हणून हिला जाचक ठरु शकतो.
ज्या मुलीवर माझे अतोनात प्रेम आहे, तिला भविष्यात माझ्यामुळे त्रास व्हावा, हे मला बिलकुल पटत नाही.
ती आयुष्यभर सुखी रहावी, हीच माझी इच्छा आहे, हेच माझं तिच्यावरचं प्रेम आहे, जे आयुष्यभर राहिल.
तिला सुद्धा माझ्या या निर्णयाची जाणीव आहे."

माझ्या मित्राची, वैचारिक प्रगल्भता बघून मी प्रचंड प्रभावित झालो होतो व आजही आहे.

आमच्या एका मैत्रिणीने, तिला आवडणाऱ्या मित्राच्या ऑटोग्राफ बुकमध्ये लिहिले होते,
When You love someone, set it free. If it is yours, it will come back. Otherwise it was never yours!

तिच्या मते, प्रेम हा वन वे ट्रॅफिक असू शकतो. माझे प्रेम आहे, पण समोरुन त्याला प्रतिसाद मिळणे, माझ्या हातात नाही. अशा वेळी, मी व्यक्त होऊन मोकळी झाले. नंतर, बोलायला हवं होतं, अशी हुरहूर राहणार नाही.

अलंकारिक भाषेत, ज्यांच्या मनाच्या (मन नावाचा कोणताही अवयव माणसाच्या शरीरात नाही) तारा जुळल्या आहेत, त्यांनी लक्षात ठेवायला हवे;
प्रेम ही केवळ एक भावना नाही. तर खरं प्रेम तुमच्या कृतीतून जाणवले पाहिजे.

लग्नाआधी तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणीन, असं सांगणारा मुलगा, लग्नानंतर बाजारातून येताना भाजी पण आणत नाही.

सोन्याचा दागिना करताना, किंवा साधी फळं घेताना, विचारपूर्वक वा निवडून घेता ना.. दागिना परत घडवता येईल, वा फळं परत विकत घेता येतील.. पण तुमचा साथीदार निवडीचा निर्णय चुकला तर मात्र त्याचे वेगळे परिणाम भोगावे लागतील.

पूर्वी प्रेम ही एक उदात्त भावना होती, आजही आहे.
परंतु सध्याच्या युगात त्याला अनेक कंगोरे सुद्धा आहेत, त्यांचा प्रॅक्टिकली विचार करणे, आवश्यक आहे.

तुमचं एखाद्यावर प्रेम करणं, हा बावळटपणा होऊ देऊ नका. समोरील व्यक्ती, तुमचा उपयोग करुन घेत असेल व ते तुम्हाला मान्य असेल, तर मग कोणतीही प्रतिक्रिया न देता, आहे ते वास्तव आणि भविष्य स्विकारा.

जी व्यक्ती स्वतः वर खरे प्रेम करत नाही, ती इतरांवर सुद्धा खरे प्रेम करू शकत नाही. अशा व्यक्तींचे प्रेम, हे सुदृढ असते; प्रेमासाठी स्वतःचे स्वत्व विकून परावलंबन स्विकारलेले असते, यांना स्वतःचा मान सन्मान नसतो, हे केवळ समोरील व्यक्तीच्या प्रेमाचे आश्रित असतात.

तुमच्या आयुष्यात, अशी बेभानपणे प्रेम करणारी व्यक्ती असेल; तर भान ठेवून त्यांचा विचार करा. आणि त्यांच्याशी सद्सदविवेकबुद्धीने व जबाबदारीने वागा.

आणि हो, संत व्हॅलेंटाईन यांचा प्रेमाचा संदेश सगळ्यांसाठी होता, हे लक्षात ठेवा.

प्रेमात पडू नका, प्रेमात उभे राहा.
- स्वामी विवेकानंद

आपलाच,
बिपिन मयेकर
वैयक्तिक मार्गदर्शक
7021508470
myself.bipin@yahoo.co.in

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?