मनातलं

 


मनातलं


काउंसलिंग सेशन सुरू होते. प्रश्न विचारल्यावर मारियाची मान खाली गेली. तिने जेव्हा मान उचलली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थोडेसे का होईना, वेगळे हावभाव होते. तिच्या डोळ्यांची किंचित हालचाल झाली. 

(नाव बदलले आहे)


मी तिला सांगितले, "या प्रश्नाने तुला त्रास होत असेल, तर आपण वेगळ्या विषयाकडे जाऊ या. जेव्हा तुझी मानसिक व भावनिक तयारी असेल, त्यावेळेस आपण या विषयावर पुढील चर्चा करु या."


आता मारियाच्या चेहर्‍यावर थोडे आश्चर्याचे भाव होते. तिने घाबरत विचारले, "तुम्हाला कसे समजले? 


मी शांतपणे तिला समजावले, "सध्या ते महत्वाचे नाही आपण आपल्या काऊंसलिंग सेशन कडे वळू या."


नंतर, प्रत्येक प्रश्नावर, मारियाच्या मनःस्थितीला ओळखत, मी प्रश्नांचा ओघ वळवत राहिलो. मारियाला आता ते समजू लागले होते.


सेशन पूर्ण झाल्यावर मारिया शांत व स्थिर झाली होती. तिच्या समस्यांची उत्तरे, तिने शोधून काढली होती. त्या प्रक्रियेत मी फक्त तिला मदत केली होती. निघताना मारिया थोडे पुढे जाऊन, परत थांबली. 


मी विचारले, "अजून काही समस्या आहेत काय?" तिने ठामपणे नाही सांगितले, आणि आत्मविश्वासाने मला विचारले, "तुम्ही जे मनातील ओळखता, ते मला शिकायचे आहे."


मी तिला विचारले, "ते ओळखून तू काय करणार आहेस?" 


तिने सांगितलं, "विशेष काही नाही. पण मला आवडेल, इतरांच्या मनातील जाणून घ्यायला."


अशाच प्रकारे अनेक जणांची उत्सुकता ताणली जाते, इतरांच्या मनातील जाणून घेण्यासाठी! सर्वसाधारणपणे, सामान्य माणसाला यातील 'मी मनातलं ओळखू शकतो!' याचेच आकर्षण असते. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया, गुण व परिणामांचा विचार व स्विकार; याबद्दल जाणीव नसते.


मी मारियाला समोर बसण्यास सांगितले आणि समजूतदारपणे तिला सांगितले, "समोरील माणसाच्या मनातील विचार व भावना ओळखणे, हे थोड्याफार वेळात शिकता येईल. पण, त्या प्रक्रियेतील, स्वतःच्या मनावर होणारे चांगले व वाईट परिणाम जाणून, त्यांना सामोरे जाऊन, स्वतःची मानसिक व भावनिक अवस्था जपणे, आणि संवादातील व नात्यातील समन्वय सांभाळणे, हे सर्व करण्यासाठी कित्येक वर्षे द्यावी लागतात. तू आत्ताच एका समस्येतून सावरते आहेस, अशा अवस्थेत तुझ्याच जवळच्या नात्यातील किंवा मित्र-मैत्रिणीच्या मनातील वेगळे किंवा तुझ्या बद्दल चांगले नसलेले विचार व भावना तुला समजल्या, तर तू स्वतःला कितपत सावरु शकशील?" 


यावर ती थोडीशी खजील झाली. मी तिला धीर दिला आणि सांगितले, "माझ्या आईच्या मते, 'अज्ञानात सुख असतं!' कधी कधी, एखादी स्वतःबद्दलची सकारात्मक नसलेली माहिती समजली, तर त्याच्यामुळे आपल्यामधील सकारात्मकता कमी होऊ शकते."


तसं पाहिलं तर, सर्वसामान्य माणसांपैकी, बहुतेक जणांकडे ही कला थोड्या प्रमाणात का होईना, उपजत असते. पण, नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, यातील अनेक जण बहुतेक वेळा आडाखे बांधतात किंवा अंदाज लावतात. यात अति-आत्मविश्वासामुळे किंवा गृहित धरण्याच्या सवयीमुळे चूक घडू शकते. गैरसमज निर्माण होऊ शकतात. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. हे सर्व टाळण्यासाठी महत्वाची जबाबदारी घ्यावी लागते.


माझ्या व्यावसायिक कामामुळे, मला ही तंत्रे माझ्या ट्रेनिंग प्रोग्राम्स, बिझनेस कॉचींग, पर्सनल मेंटरींग व वैयक्तिक कौन्सिलिंग सेशनमध्ये वापरावी लागतात. मी ही तंत्रे सतत वापरल्यामुळे, परमेश्वराच्या कृपेने, मला त्यातील बऱ्यापैकी कौशल्य प्राप्त झाले आहे. याचे संपूर्ण श्रेय, मी माझ्या व्यवसायाला देतो; तसेच ज्या विविध गुरुंनी मला ही तंत्रे योग्य रितीने शिकवली, त्यांचा मी आजही ऋणी आहे.


माझ्या क्षेत्रात, मला 'अंतर्मनातील विचार व भावना समजणारा' म्हणून ओळखले जाते. आपल्या मनाचे; बहिर्मन (conscious mind), अंतर्मन (subconscious mind) व सुप्तमन (unconscious mind); असे तीन भाग असतात. 


अंतर्मनात व सुप्त मनात दडलेल्या अनुभवांतून आलेल्या मतांचा, समजूतींचा व काही खात्रीशीर विचारांचा, आपल्या आयुष्यावर प्रभाव असतो. हा प्रभाव; आपल्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या निर्णयांचे, स्वभावाचे, तसेच वाणण्याबोलण्याचे; दिशादर्शक असतात. 


जेव्हा समोरील व्यक्ती आपल्यासमोर बोलत असते, तेव्हा त्या व्यक्तीची शारिरीक भाषा (body language), चेहऱ्यावरील अगदी सूक्ष्म बारकावे, डोळ्यांची हालचाल, शब्दांची कळत-नकळत होत असलेली निवड व नमुने (patterns), शब्दोच्चार (volume, tone, pitch, pause, etc), प्रश्न विचारल्यावर यात होणारे फरक, इत्यादी बाबी समोरील व्यक्तीचा मनातील हेतू, अपेक्षा व मूळ स्वभाव ; जाणून घ्यायला मदत करतात. यात त्या व्यक्तीसोबतचे पूर्वानुभव असतील, तर ते संदर्भासाठी उपयुक्त ठरतात. या पुराव्यांशिवाय मनातील ओळखण्याचा दावा फोल ठरु शकतो.


तसेच, वरील सर्व बाबींचा एकत्रित वापर करणे, तितके सोपे नसते. त्यासाठी त्यातील सखोल अभ्यास करावा लागतो. चौकस कुतुहल व सूक्ष्म निरीक्षण शक्ती असावी लागते. नैसर्गिक व सहज पकड मिळवण्यासाठी जिद्द आणि चिकाटी ठेवावी लागते.


प्रसन्न NLP मध्ये, मी शिकवितो की, Goal is the means towards outcome. ध्येय हे परिणामांकडे नेणारे साधन आहे.


परिणाम (outcome) जास्त महत्वाचे असतात. समोरील व्यक्तीच्या मनातील हेतू व भावना जाणून, आपल्याला नेमकं काय साध्य करायचे आहे?


प्रशिक्षणक्रम घेत असताना, समुपदेशन (counseling) करत असताना, वैयक्तिक मार्गदर्शन (personal mentoring) करताना, राजकीय सल्लागार म्हणून कार्यरत असताना तसेच सामाजिक क्षेत्रात, यांचा सकारात्मक उपयोग करुन घेता येतो.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कित्येकदा समोरील व्यक्तीच्या मनात, तुमच्याबद्दल सकारात्मक भावना वा विचार नसतात, अशा वेळी, स्वतःच्या मनःस्थिती वर पूर्ण नियंत्रण असावे लागते. आपल्याला जे समजले, ते कित्येकदा समोरील व्यक्तीला जाणवू न देता, संवाद सुरु ठेवावा लागतो. किंवा तटस्थपणे अलिप्त होता आले पाहिजे.


अत्यंत आवश्यकता असेल तर समोरील व्यक्तीला कल्पकतेने सूचित करावे लागते किंवा पुढील संवादाचा वा वर्तणुकीचा ओघ, त्या आधारावर वळवावा लागतो.


एकदा समोरील व्यक्तीच्या मनातील हेतू व भावना ओळखता आल्या की मग प्रसन्न NLP मधील विशिष्ट तंत्राद्वारे त्या व्यक्तीशी सलोखा निर्माण करणे, सोपे होते. पण मग त्यासाठी तुमची सद्सदविवेकबुद्धी जागरुक हवी. तुमच्या विचारांवर विवेकाचा लगाम हवा.


या विषयावर, पुढील लेखामध्ये सविस्तर चर्चा करु या!


आपलाच,

बिपिन मयेकर

National Federation of Neuro Linguistic Programming' USA तर्फे जागतिक पातळीवर तिसरी निवड व भारतामधून प्रथम मान्यताप्राप्त

NLP GOLD MASTER Trainer

Experience of 25 years



Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?