स्नेहसंमेलन

 *शाळासोबत्यांचे स्नेहसंमेलन* (Reunion)


लहान मुले पटकन एकत्र येऊ शकतात, पण मोठ्या माणसांसाठी एकत्र येण्याची प्रक्रिया कठीण असू शकते. कारण वयपरत्वे, प्रत्येकाची स्वतंत्र मनोवृत्ती तयार झाली असते, ज्यातून प्रत्येकजण स्वतःभोवती छोटेमोठे भावनिक कुंपण तयार करुन ठेवतो. हे भावनिक कुंपण मग एकतर समाजात मिसळण्याची क्षमता, कमीजास्त करत जाते.


शाळासोबत्यांचे स्नेहसंमेलनामध्ये, सर्व स्वभावाची माणसे एकत्र येतात. यातून प्रत्येकाची, सामाजिक संवेदनशीलता वाढू शकते, जेव्हा अशा प्रकारचे स्नेहसंमेलन, चांगल्या हेतूने व योग्य रितीने, आयोजित केलेले असेल. 


फक्त एकमेकांना खूप वर्षांनी भेटण्यापुरते, स्नेहसंमेलन मर्यादित ठेवले, तर पहिल्या एकदोन भेटींनंतर, मनोबंध जुळले नाहीत तर मग बहुतेकांच्या भेटीतील अप्रूप कमी होऊ शकते. 


याचे.कारण, जे अगोदरपासून एकमेकांच्या संपर्कात असतात, ते ज्या मनमोकळेपणाने एकमेकांना भेटतात, ते पाहून सामाजिक न्यूनगंड असणाऱ्या मित्रमैत्रिणींची भीड अजून वाढते. 


धमाल करत असलेल्या, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात, शिरण्यापेक्षा मग एकटे बसणे, किंवा आपल्यासारख्या एखाद्यासोबत, टाईमपास करणे, ते पसंत करतात.


याउलट, अहंकार असणारे मित्रमैत्रिणी, अशा घोळक्यापासून दूर राहतात, कारण त्यांना स्वतःहून पुढाकार घेणे, आवडत नाही.


या दोन्ही प्रकारच्या मित्रमैत्रिणींना, त्यांच्याजवळ जाऊन, त्यांना भेटणे आवश्यक असते. एकदा त्यांचे बाह्य आवरण दूर झाले तर मग ते खुलण्याची शक्यता असते.


फक्त भेटताना, मनमोकळेपणा व तारतम्य, या दोघांचा समन्वय असायला हवा. कारण, एखादा चुकीचा विनोद अथवा वाक्य, समोरच्याला दुखावू शकते. 


खरं तर, बालवयात निर्माण झालेल्या मैत्रीमध्ये हेवेदावे असण्याचे कारण नाही. पण अंतर्गत मानवी स्वभावात, षड्रिपु (मद, माया, मोह, मत्सर, काम व क्रोध) कोणत्या स्वरुपात ठाण मांडून बसलेले असतील, ते सांगता येत नाही. यातूनच, कित्येकदा स्नेहसंमेलनामध्ये येण्यापूर्वी काही जणांचे, आपांपसात वादविवाद असू शकतात. ते बहुतेक नातेसंबंधांमध्ये असतात. फक्त, स्नेहसंमेलनाला येताना, प्रत्येकजण व्यापक दृष्टिकोन व खुल्या मनाने आला तर कार्यक्रम सुरळीतपणे व सर्वांना जोडणारा होतो.


१. स्नेहसंमेलनाच्या ठिकाणी लवकर पोहोचावे. जेणेकरुन सुरुवातीपासून तुम्ही जास्तीत जास्त जणांशी जोडले जाता.


२. शक्य असल्यास, तुमच्या क्षमतेनुसार, स्नेहसंमेलनामधील कामांच्या जबाबदाऱ्या उचलाव्या.


३. स्नेहसंमेलनामध्ये, शाळेत चांगली मैत्री होती व आता खूप वर्षांनी  दिसणाऱ्या मित्रमैत्रिणींना, (त्यांनी पुढे येण्याची वाट न पाहता) जितक्या त्वरित भेटता येईल तितक्या त्वरेने भेटा.


४. तुम्ही ज्या मोकळेपणाने सामोरे जाता, तितका मोकळेपणा समोरच्या मित्रमैत्रिणीकडून नाही आला, तरी नाराज न होता, पुढच्या मित्रमैत्रिणीला भेटा. एखाद्यावर वेगळा ताणतणाव असू शकतो. Every friend has his/her own story!


५. ज्यांना तुम्ही शाळेत व आताही ओळखत नाही, अशा मित्रमैत्रिणींना भेटून, छान हास्यासह ओळख करुन घ्या व स्वतःची थोडक्यात ओळख करुन द्या.


६. अशा स्नेहसंमेलनामध्ये, शक्यता कमी असते, पण तुमच्यावर जळणारा मित्र वा मैत्रीण, असू शकते. त्यांना भेटून, जर काही गैरसमज असेल तर तो दूर करा. त्याने काम होत नसेल तर मग अशांना दूर ठेवा.

तुमच्याकडून सुद्धा एखाद्यावर, उगाचच आकस असेल तर तो दूर करा. मत्सर, असा रोग आहे, जो इतरांप्रती बाळगला जातो, पण नुकसान मत्सर बाळगणाऱ्याचे करतो. अशा मत्सरातून, अनवधानाने निघालेले एखादे वाक्य, सर्व मित्रमैत्रिणींसमोर आपली वेगळी प्रतिमा तयार करते.


७. स्नेहसंमेलनामध्ये, तुमच्या व्यावसायिक पदांचा इतरांना त्रास न होता, आवश्यक असल्यास, योग्य तेव्हढेच सहकार्य झाले पाहिजे.


८. मोठे झाल्यावर, प्रत्येकाचा स्वतंत्र सामाजिक व अथवा राजकीय कल निर्माण झालेला असू शकतो. पण स्नेहसंमेलनामध्ये, त्याला बगल देत, मैत्रीला प्राधान्य दिले पाहिजे.


९. काही मित्रमैत्रिणी दुसऱ्या शहरातून येतात. अशांचे खास स्वागत झाले पाहिजे. कारण स्थानिकांपेक्षा जास्त वेळ, पैसा व मेहनत त्यांनी दिलेली असते.


१०. स्नेहसंमेलनामध्ये, पूर्ण वेळ खेळीमेळीचे वातावरण राहील व जास्तीत जास्त जणांना (शक्य असल्यास सर्वांना) भेटता येईल, असे आपले प्रयत्न असावेत.


११. स्नेहसंमेलन संपताना, तुमच्या मनात जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींच्या चांगल्या आठवणी व पुन्हा लवकर भेटण्याची हमी असायला हवी. प्रसन्न शुभेच्छा!


बिपिन मयेकर

तुमचे यश हाच माझा व्यवसाय!


Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?