खोटी प्रशंसा, निंदा व विधायक टिका

 खोटी प्रशंसा, निंदा व विधायक टिका!

- बिपीन मयेकर (लेखक)


प्रत्येकाला, आपले वागणेबोलणे मान्य असेल किंवा पटेल, हे शक्य नाही. पण, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. आपण आपल्या शब्दांची व कृतींची कितीही काळजी घेतली, तरी त्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन सारखा नसणार. *प्रत्येक जण स्वतःच्या दृष्टिकोनातून, आपल्या वागण्याबोलण्याचा अर्थ लावत असतो.*


कित्येक जणांचे व्यक्त होणे, हे खूपच विचित्र किंवा विक्षिप्त असते. काही जणांचा, *अंतस्थ हेतू वेगळा* असतो. काही जण, *आपल्यावरील अतिप्रेमामुळे/आपुलकीमुळे, सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करत, चुकीची प्रशंसा करतात.*


आपण जेव्हा आपल्या अंतस्थ प्रामाणिक हेतू बाबतीत जागरुक असतो, तेव्हा आपल्या हातून खोटी प्रशंसा किंवा निंदा होत नाही. 


खोटी/चुकीची प्रशंसा, तुम्हाला चुकीच्या भावविश्वात नेऊ शकते. तुमच्या समोर एक मृगजळ निर्माण करु शकते. *खोट्या/चुकीच्या प्रशंसेमुळे, सत्य व वास्तव परिस्थितीचे आकलन होत नाही. आपण बेसावध होऊ शकतो.* ज्याचा उपयोग विरोधक करु शकतात.


माझ्या राजकीय व्याख्यानांमध्ये मी नेहमी सांगतो, *इतर बादशहांकडे खोटी प्रशंसा करणारे, अवतीभवती होते; तर महाराजांकडे अष्टप्रधान होते*; अकबराकडे बिरबल होता.


*तुमच्या सभोवती कोण आहेत, याचे भान ठेवा.* पुढे जाताना, आपल्याला सर्व जणांना सोबत घ्यावे लागते. पण *कुणाचे किती ऐकायचे व किती जवळ अथवा दूर ठेवायचे, याची काळजी घ्यायला हवी.* कित्येकदा, चुकीच्या व्यक्ती, चांगल्या व्यक्तींना तुमच्यापासून दूर नेतात.


काही सूचना:


*खोटी/चुकीची प्रशंसा करणाऱ्यांपासून, आपल्या करिअरमध्ये, स्वतःचे मानक (standard) टिकवण्यासाठी सावध असावे लागते.*


*खोटी/चुकीची प्रशंसा करणाऱ्यांमुळे, आपली कमकुवत स्थाने विसरता कामा नये.*


 *खोटी/चुकीची प्रशंसा करणाऱ्यांमुळे, सत्य परिस्थितीकडे दुर्लक्ष होऊन, भविष्यात तडजोडी कराव्या लागणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.*


*खरे हितचिंतक ओळखता आले पाहिजे.*


आता दुसऱ्या प्रतिसादाकडे वळू या: निंदा


*प्रत्येक द्वेषयुक्त निंदा करणाऱ्या व्यक्तीमध्ये बहुतेक वेळा, एक ढोंगी माणूस लपलेला असतो.*


आईन्स्टाईन यांच्या मते, *एखादी टिका जेव्हा योग्य माहिती न घेता केली जाते, तेव्हा त्यामागे अज्ञानी व्यक्ती असते.*


जोपर्यंत आपण एखादी गोष्ट स्विकारत नाही, तोपर्यंत ती आपली होत नाही.


एकदा एक संत आपल्या शिष्यांबरोबर चालत होते. वाटेत एक विक्षिप्त व्यक्ती दिसली. त्या व्यक्तीला संतांनी नमस्कार केला. त्यावर ती विक्षिप्त व्यक्ती त्या संतांना घाणेरड्या शिव्या देऊ लागली. शिष्यांचा रागाचा पारा चढू लागला. पण, संतांनी त्या विक्षिप्त व्यक्तीला एक चांगले हास्य दिले व ते पुढे चालू लागले. त्यांचे शिष्य हैराण झाले होते. 


एका शिष्याने धीर करून विचारले, "त्या माणसाने तुम्हाला इतक्या घाणेरड्या शिव्या दिल्या, पण तुम्ही त्याला हास्य दिले. कशासाठी?"


संतांनी सांगितले, "मी नंतर याचे उत्तर देईन." 


वाटेत नदीकाठी सर्वजण पाणी पिण्यासाठी थांबले. खाली उतरताना, संतांनी आपले कमंडलू वर ठेवले होते. ते संत जेव्हा हाताने पाणी पिऊ लागले, तेव्हा प्रश्न विचारणाऱ्या शिष्याने आपले कमंडलू पुढे केले. त्याच्या गुरुंने ते नाकारले व घेतले नाही. त्यांनी ओंजळीत पाणी घेतले व ते पाणी प्यायले. पाणी पिऊन झाल्यावर, वर येऊन ते चालू लागले.


बाजूने चालणाऱ्या त्याच शिष्याला त्यांनी विचारले, *"कमंडलू तू मला देत होतास, ते घेतले असते तर ते माझ्याकडे आले असते. पण मी ते घेतले नाही, तेव्हा ते कोणाकडे राहिले?"*


यावर शिष्याने उत्तर दिले, "माझ्याकडेच राहिले." यावर हसून मंद स्मित करत गुरुंनी उत्तर दिले, *"त्या माणसाच्या शिव्या सुद्धा मी घेतल्या नाहीत."*


यावर, सर्व शिष्यांचे डोळे विस्फारले व त्यांच्या चेहऱ्यावर आत्मज्ञानाचे हास्य पसरले.


त्या संतांनी नंतर शिष्यांना समजावले, *"जेव्हा तुमच्याकडे दयाभाव, आपुलकी व संयम असतो; तेव्हा तुम्ही नकारात्मक भावनांपासून दूर होता."*


ते संत होते, परंतु आपल्यापैकी कित्येक जणांना आपल्या विरोधकांच्या बाबतीत जास्त दयाभाव किंवा आपुलकी दाखवून चालत नाही. पण तरीही *आपल्याकडे संयम असायला हवा जेणेकरून रागाच्या भरात आपल्याकडून चुकीचे पाऊल पडणार नाही.*


आता, महत्वाचा मुद्दा म्हणजे, *विधायक टिका..*


विन्स्टन चर्चिल यांच्या मते,

*टिका आवडली नाही तरी ती आवश्यक असते. ती दुखण्यासारखी असते. आपल्या शरिरात जिथे लक्ष देण्याची आवश्यकता असते, तिथे दुखणे सुरु होते.*


सर्वसाधारण टिका व विधायक टिका, यात फरक असतो. सर्वसाधारण टिका, फक्त समस्येकडे लक्ष वेधून घेते. तर, *विधायक टिका, त्या समस्येच्या उपायांवर लक्ष देते.*


सर्वसाधारण टिका, भूतकाळ व वर्तमानकाळामध्ये अडकून पडते, तर *विधायक टिका, उज्वल भविष्यासाठी केली जाते.*


विधायक टिकेमुळे, *आपल्याला स्वतःचे दोष अर्थात आवश्यक सुधारणा समजून घेता येतात.* आपल्यासमोर असलेले अडथळे लक्षात येतात.


*आपला दृष्टिकोन स्वच्छ असेल व आपली शिकण्याची, प्रगती करण्याची इच्छा आणि क्षमता असेल, तर विधायक टिका आपल्याला फायदेशीर ठरते.* गरज पडली तर, टिका करणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करत, सुधारणांना वाव असणाऱ्या बाबींची दखल घेता येते.


*जेव्हा विधायक टिका केली जाते आणि तुम्हाला राग येत असेल तर तिथे अहंकार असण्याची शक्यता असते.*


विधायक टिका करताना, कुणाविषयीही वाईट मत बनवले जात नाही. *सुधारणा व्हायला हव्या, यासाठी विधायक टिका केली जाते.* यामुळे, प्रत्येक टिका करणारा, तुमच्या विरोधात नसतो; तर अनेक विधायक टिका करणारे, तुमचे खरे हित पाहणारे असतात.


*लहानपणापासून, आपल्या आई-वडीलांनी तथा शिक्षकांनी, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्यावर विधायक टिका केलेली आहे, हे लक्षात ठेवा.*


विधायक टिका ही एखाद्या कृतीमधील गुण व दोष दाखवण्यासाठी असते असते तर निंदा ही एखाद्या व्यक्तीचा बद्दलचा द्वेष व्यक्त करण्यासाठी असते.


Norman Vincent Peale यांच्या मते *कित्येकदा खोटी प्रशंसा नकळतपणे खाली खेचत असते, तर योग्य व विधायक टीका ही भविष्यात प्रगती करण्याचा चांगला मार्ग दाखवते.*


काय स्विकारायचे, ते आपण प्रत्येकाने ठरवायचे असते.


फक्त खोटी प्रशंसा असो वा खोटी टिका असो, *शेळीच्या मतांमुळे, वाघाला फरक पडत नाही*, यांची खूणगाठ मनाशी बांधून ठेवा.


शेवटी, *खोट्या मैत्रीपेक्षा, प्रामाणिक टिकाकार जास्त उपयुक्त असतो.*


आपलाच,

*बिपिन मयेकर*

*तुमची प्रगती हाच माझा ध्यास*

७०२१५०८४७०




Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?