२. मत्सर: मनाला झालेली कावीळ
हेवा, मत्सर व द्वेष:
मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना
लेखक: बिपिन मयेकर ©
भाग २:
'मत्सर': मनाला झालेली कावीळ
कधी कधी रस्त्याने जाताना, एक अत्यंत महागडी, मार्केटमध्ये नवीनच आलेली भपकेदार गाडी बाजूने जाते व तिच्या मालकाचा हेवा वाटतो.. पण कित्येक जणांच्या बाबतीत, तो हेवा क्षणभर टिकतो. ती गाडी निघून गेली की, तो हेवा सुद्धा थोड्या वेळाने निघून जाण्याची शक्यता असते.
पण तीच गाडी, ऑफिसमधील एखाद्या सहकाऱ्याची असेल व माणसाचा स्वभाव दुबळा असेल, तर हेवा लोणच्यासारखा, मुरत जाण्याची शक्यता असते.
काही स्त्रियांचे, दागिन्यांबाबतीत वा अन्य बाबतीत असे घडू शकते.
पण, कधी कधी, मित्रांमधील, ऑफिसमधील, व्यवसायातील वा नात्यांमधील, एखाद्याची प्रगती किंवा त्याच्याकडे वळणारे बहुतेक सर्वांचे लक्ष (attention) डोळ्यात खुपते. कधी त्याची राहण्याची जागा किंवा किंवा त्याचा बोलण्यातून प्रभाव टाकण्याचा अंदाज, तिची सुंदरता, त्याचा रुबाबदारपणा, स्वतःकडे सर्व नियंत्रण (control) ठेवण्याचा अट्टाहास, अशा अनेक बाबतीत 'हेवा' उत्पन्न होऊ शकतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये 'हेवा' हळूहळू वाढू लागतो, तेव्हा या व्यक्तीमध्ये एकत्र आर्थिक/व्यावसायिक दृष्ट्या,अथवा ठराविक नातेसंबंधाविषयी किंवा सामाजिक प्रतिष्ठा/राजकीय यशासंबंधित अथवा मालमत्ता/दागदागिने किंवा प्रसिद्धी अशा वेगवेगळ्या स्तरांवर, स्वतःबद्दल कमतरता वाटू लागते. त्यातून स्वतःबद्दल असुरक्षिततेची भावना तयार होते आणि समोरच्या व्यक्तीबद्दलअसूया निर्माण होत जाते.
जेव्हा 'हेवा' या भावनेकडून, मनुष्य 'ईर्ष्या' वा 'मत्सर'या भावनेकडे झुकू लागतो; तेव्हा त्याच्यातील नकारात्मक भावना वाढू लागते. आणि मग स्वतःच्या प्रगती ऐवजी, दुसऱ्याच्या अधोगतीकडे अशी व्यक्ती जास्त लक्ष देऊ लागते. यातून समोरच्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो, पण या व्यक्तीचे सुद्धा भले होत नाही.
हल्ली कित्येक लहान मुलांमध्ये सुद्धा 'मत्सर' जास्त प्रमाणात जागा होऊ लागला आहे. त्यामुळे शाळा व शाळेबाहेर, मुलांचा आपापसातील तणाव वाढू लागला आहे. काही आई-वडील मुलांना समजावून सांगण्यापेक्षा, त्यांना अधिक भरीस पाडत आहेत.
शाळेतील मुलांची ही अवस्था, तर अशा 'मत्सर'ग्रस्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये काय घडत असेल?
अर्थात, चांगल्या व संस्कारित मुलांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.
लहान असो वा मोठे, जेव्हा 'मत्सर' मेंदूत प्रवेश करतो, तेव्हा समोरील व्यक्तीचा, स्वतःचा वा परिस्थितीचा राग येऊ लागतो. एकदा रागाने मेंदूचा ताबा घेतला की मग वागण्या_बोलण्या वरील नियंत्रण जाऊ लागते. त्याचा परिणाम कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक नात्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
कित्येकदा 'मत्सर' शारिरीक ठेवणीवरुन सुद्धा निर्माण होऊ शकतो. एखादी व्यक्ती अतिरिक्त जाड किंवा बारीक असेल, अथवा दिसायला चेहऱ्याने सुंदर नसेल आणि या बाबींना अतिरिक्त महत्व देत असेल, तर मग समोर एखादी शारिरीक ठेवण व सुंदरता या निकषांवर आधारित, सडपातळ/सुदृढ व किंवा सुंदर/आकर्षक व्यक्ती समोर आली की, मग 'मत्सर' ग्रस्त व्यक्तींच्या मनात असंतोष माजतो. आणि या व्यक्ती स्वतःलाच नाकारतात. स्वतःचा तिरस्कार करु लागतात. टिव्हीवरील काही जाहिराती आगीत तेल ओतण्याचे काम करतात. अशा व्यक्ती चुकीचे पाऊल उचलू शकतात.
लहान मुलांच्या बाबतीत ही बाब खूपच गंभीर रितीने हाताळायला हवी आहे. DSH अर्थात Deliberate Self-Harm यावर आज जगभर संशोधन सुरु आहे.
कित्येकदा पैशांचा वा संसाधनांचा अपुरेपणा, सुद्धा 'मत्सर' निर्माण करु शकतो. यात बहुधा, कुटुंबातील सदस्यांसाठी, खास करुन मुलांसाठी काही करु न शकण्याची असहाय्यता असते. त्यातून मग 'आहे रे' वाल्यांबद्दल; 'नाही आहे रे' वाल्यांच्या मनात 'मत्सर' निर्माण होऊ शकतो.
लायक असलेल्या व्यक्तीला डावलून, लायक नसलेल्या व्यक्तीला; जेव्हा संधी दिली जाते, तेव्हा राग येणे स्वाभाविक व नैसर्गिक आहे. पण, मग त्या रागापोटी सरसकट त्या संस्थेविषयी वा घटकांबद्दल 'मत्सर'निर्माण होऊ शकतो.
हा 'मत्सर' सध्या समाजात 'तिरस्कार' यासारख्या घातक भावनेपर्यंत, पोहोचलेला आढळून येतो. काही स्वार्थी नेते यातून अधिक तेढ निर्माण करुन, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात.
'मत्सर' या नकारात्मक भावनेपासून दूर राहण्यासाठी, खालील काही उपाय आपण करु शकतो:
१. आपल्यामधील 'मत्सर' जागा होत आहे, ही जाणीव पहिली महत्त्वाची बाब आहे. मग तुम्ही त्यांच्यावर योग्य उपचार करु शकता.
२. तुमच्याकडे जे आहे, त्याबद्दल स्वतःकडेच कृतज्ञता व्यक्त करा.
३. 'मत्सर' करण्याऐवजी, त्याच मुद्द्याला ध्येय वा प्रेरणा बनवा.
४. आपल्या एखाद्या तारतम्य असणाऱ्या मित्रमैत्रिणीपाशी वा कुटुंबातील सदस्यापाशी, मन मोकळे करा. नकारात्मक भावनेचा निचरा होऊ द्या.
५. कधी कधी, ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला 'मत्सर' वाटतो, त्यांचा समाजातील मुखवटा व प्रत्यक्षातील दुःखे वेगळी असू शकतात. ती समजली तर तुम्ही स्वतःला जास्त नशीबवान समजाल.
६. वास्तविकता मान्य करा.
७. स्वतःला महत्व द्या.
आपलाच,
बिपिन मयेकर ©
तुमची प्रगती हाच माझा ध्यास
७०२१५०८४७०
myself.bipin@yahoo.co.in
सदर लेख, संपूर्ण मजकूर, दिलेले पूर्ण नाव, फोन क्रमांक व इमेल सह; आपण फॉरवर्ड वा कॉपी-पेस्ट करु शकता.

Comments
Post a Comment