संवाद साधा. सत्य परिस्थिती जाणून घ्या!





तो कारमध्ये बाजूलाच बसला. कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नजर चुकवत होता. माझा खास मित्र होता, म्हणून मी चपापलो.

मुंबई विद्यापीठाच्या हिरव्यागार वातावरणात, नुकतंच प्रसन्न एनएलपीचे पहिल्या दिवसाचे ट्रेनिंग सेशन आटोपून निघालो होतो. आज खूश होतो, कारण माझा खास मित्र प्रसन्न एनएलपीच्या कोर्ससाठी आला होता. सकाळी सगळ्या प्रशिक्षणार्थींची ओळखपाळख झाली. सर्वांबरोबर मित्राचा चेहरा उत्सुकतेने भरला होता.

लंचपर्यंत तो आनंदाने सहभागी होत होता, पण लंचनंतर तो थोडा मागे कलला होता. आणि आता गाडीत बसल्यावर वर नमूद केलेला प्रकार!

"काय झालंय?" असे विचारताच तो तुटून पडला. 
"अरे, मित्र ना तू? मग शिकवताना माझ्या घरातले संदर्भ कशासाठी? तू देत असलेली बहुतेक उदाहरणे माझ्या घरातील व्यक्तींची होती. कशासाठी?"

जोरात व सलग बोलण्यामुळे त्याला खोकला उचलला. मी पाण्याची बाटली पुढे करत त्याला विचारले, मला सांग, मी कुणाचे नाव घेतले होते काय? नाही ना!" त्याने नकारार्थी मान हलवली. मी समजावले, "मी एकाच कुटुंबातील उदाहरणे दिली तर इतर प्रशिक्षणार्थी त्याबरोबर कसे कनेक्ट होणार? मला ते व्यवसायाच्या अनुषंगाने परवडेल काय?"

आता तो शांत होऊन ऐकत होता. "मी कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या निमित्ताने, भारतातील सर्व प्रमुख शहरे आणि देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात हजारों लोकांना भेटलो आहे. त्यांचे अनुभव ऐकले आहेत. आपल्या मराठी म्हणीप्रमाणे 'घरोघरी मातीच्या चुली' असतात. सगळ्यांकडे एकच चूल नसली, तरी चुलींचे अर्थात कुटुंबांचे ठराविक प्रकार असतात. तेच संदर्भ घेऊन मी बोलत होतो." माझ्या घराजवळ उतरुन, तिथे समोरील रस्त्यावर पार्क केलेली त्याची गाडी घेऊन तो गेला.

दुसऱ्या दिवशी, सकाळी आल्यावर त्याने इतर प्रशिक्षणार्थींकडून अंदाज घेतला. तेव्हा त्याच्या लक्षात आले, प्रत्येकालाच कालच्या दिवसातील अनेक संदर्भ कनेक्ट झाले होते.

आता संवाद झाला म्हणून त्याचा गैरसमज दूर झाला. कित्येकदा असे होते. खरी वस्तुस्थिती जाणून न घेता, केवळ स्वतःच्या विचारातून मत बनवले, तर त्यातून 'गैरसमज'होऊ शकतो.

एका नामांकित वृत्तपत्राच्या माननीय संपादकांनी स्टेजवरुन सांगितले होते, "मयेकरांकडे काही पत्रकारांकडे नसतात, इतक्या बातम्या असतात." परमेश्वराच्या आशीर्वादाने, प्रशिक्षणाच्या माध्यमातून, देशभरात व खास करुन मुंबईतील विविध भागात व विविध क्षेत्रांमध्ये ओळखी झाल्या आहेत. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीचा साठा व त्याचा प्रशिक्षणात आणि लेखनामध्ये केलेला वापर, यामुळे जवळजवळ सर्वांना ते कनेक्ट होतात.

पण वरील मित्राप्रमाणे संवाद साधला तर ठीक, अन्यथा गैरसमज होऊ शकतो व वाढू शकतो. इथे संवादाला मी सुरुवात केली, कारण मित्र समोर होता व त्याच्या देहबोलीने व चेहऱ्यावरील हावभाव मला खूप काही सांगून गेले होते. पण जे समोर नसतील, त्यांचे काय?

काही वेळेस, असा कनेक्ट सकारात्मक सुद्धा असतो व स्वत:च्या विचारातून बनवलेले मत आनंद निर्माण करु शकते.

बाजूलाच ठेवलेल्या मोबाईल फोनची बेल वाजली. मी पाहिले, मोबाईल फोनच्या स्क्रीनवर 'अक्षय'चे नाव दिसत होते. अक्षयचे आणि फोनवर कित्येक महिने बोलणे झाले नव्हते. मी पटकन फोन उचलला. 

अक्षयचा हर्षभरित आवाज आला, "सर, मी आता जो विचार करत होतो, त्याच्याशीच निगडित वॉट्सॲपवर तुमचा मेसेज आला आहे. यापूर्वीही असं घडलेले आहे. थॅंक यू!"

इथेही संवाद घडला, म्हणून मला सकारात्मक पोचपावती मिळाली. असा अनुभव अनेक जणांच्या बाबतीत घडतो.

खरं तर, मी तो मेसेज, सोशल मिडियाद्वारे हजारों जणांना पाठवला होता. पण ठराविक जणांशी सकारात्मक रितीने 'कनेक्ट' झालेला असतो.

पण, कधी कधी, एखादा मेसेज नकारात्मक रितीने सुद्धा स्विकारला जाऊ शकतो. काही जण 'आ बैल मुझे मार' या पद्धतीने तो मेसेज स्वतःवर ओढवून घेतात, तर काही जणांना 'खाई त्याला खवखवे' या पद्धतीने त्या मेसेज मधील संदेश झोंबतो. 

तेव्हा, एखादा मेसेज जो सार्वजनिक आहे, त्याबद्दल किंवा मेसेज पाठवणाऱ्याबद्दल वाईट मत बनवण्यापूर्वी, तुम्हाला सत्य व पूर्ण परिस्थिती माहित आहे काय?" यांचा विचार करा. कदाचित तो तुमचा गैरसमज असू शकतो किंवा स्वतःच्या अनुभवातून व दृष्टिकोनातून तुम्ही स्वतःहून लावलेला अर्थ असतो.

संवाद साधा. सत्य परिस्थिती जाणून घ्या.

बिपिन मयेकर
कॉर्पोरेट ट्रेनर व वैयक्तिक मार्गदर्शक





Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?