करु ना, पुन्हा सुरुवात!
नेहमीचा प्रश्न, "जगताय ना?"
किडेमुंग्या व प्राणीपक्षी फक्त जिवंत राहण्यासाठी धडपड करतात, तर मनुष्य 'आयुष्य' अर्थपूर्ण जगून सार्थकी लावू शकतो.
पण आज त्याअगोदर, 'जिवंत' राहण्याची कसरत करावी लागते आहे. निसर्गाने परत आपली ताकद दाखवून दिली आहे. एका विषाणूने सर्व जगाला बंदिस्त करुन टाकले आहे. या आवश्यक बंदिस्तपणाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सामोरा जात आहे. काही अशिक्षित लोकांना अज्ञानामुळे व परिस्थितीमुळे गिचमिडीत राहणाऱ्यांना, रोगाला आमंत्रण द्यावे लागले आहे. तर काही सुशिक्षित पण असंस्कृत माणसांच्या अतिआत्मविश्वासामुळे, समाजाला धोका निर्माण झाला आहे.
आज आपल्यासाठी बाहेर पडलेल्या पोलीसांना, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना, सफाई कामगारांना रोग ग्रासतो आहे. काही जण बळी पडले आहेत. निदान त्यांच्या हौतात्म्याचा व त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या आघाताचा आदर करुन तरी या शायनिंग शूरवीरांनी काळजी घ्यायला हवी. आपण सर्वांनी त्या हुतात्म्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करायला हवी.
आपण ज्यांनी हा सावधपणा, स्वसंरक्षणार्थ मान्य केला आहे, त्यांचा आता वर्तमानकाळ कसा सुरु आहे?:
१. काही जण, सुट्टी फुलटू एन्जॉय करत आहेत, खा_प्या_लोळा_टिव्ही बघा_झोपा....
२. काही जण, विशेषतः स्त्री वर्ग (वरील कॅटेगरीशी संबंधित) व नोकरी करणाऱ्या स्त्रिया (ज्यांची घरकामाची सवय सुटली होती); मेटाकुटीला आल्या आहेत.
३. काही जण, आपला वेळ कादंबरीवाचन, चित्रकला, विविध खाद्यपदार्थ बनवणे, इत्यादी छंद पूर्ण करण्यासाठी वापरत आहेत.
४. काही जण, अनामिक भिती घेऊन वावरत आहेत. यांनी बातम्यांची चॅनेल्स अजिबात बघू नयेत. अपवाद वगळता, तिथे स्क्रिनवरील चित्रांपासून ते विज्युअल्सपर्यंत, घाबरवून टाकण्याची पूर्ण तयारी केलेली आहे.
५. काही जण, माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री, यांनी सोशल मिडियाची जबाबदारी दिल्यासारखे किल्ला लढवत आहेत. राजकारणात, कुणीच कायमस्वरुपी मित्र वा शत्रू नसतो. पण हे आपल्या (सं)वादाने मित्रांना शत्रू बनवत आहेत.
मित्रमैत्रिणींनो,
आपण लक्षात घ्यायला हवे की, सद्यपरिस्थितीत केवळ आरोग्याची नव्हे तर, आपल्या स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या उत्तरदायित्वाची, आपल्या विचारसरणीची, तसेच आपल्या जीवनशैलीची काळजी घ्यायला हवी. या बंदिस्तपणाने आपल्याला याच जन्मात, पुनर्जन्म घेण्याची संधी दिली आहे.
मुंग्या सुद्धा पावसाळ्यात व कडक हिवाळ्यात, जमिनीत खोलवर जाऊन राहतात. तिथे त्यांनी अगोदरच आपले अन्न साठवलेले असते. तुम्ही मुंग्यांना साखरेचा दाणा, मिठाईचे कण वा इतर खाद्य ओढून नेताना पाहिले असेल. मुंग्या प्रचंड सकारात्मक असणार, कारण त्या अंधारलेल्या शेकडो बंदिस्त दिवसांमध्ये एकाही मुंगीला ह्रदयविकाराचा झटका येत नाही.
जमिनीवर रेंगणारा सुरवंट सुद्धा बंदिस्तपणाच्या कोशात जाऊन, अत्यंत बिकट परिस्थितीत राहून, फुलपाखरु बनून निसर्गात झेप घेतो. आपण काय करणार आहोत?
आपल्याला अधिक सशक्त, एकत्र व आता आहोत त्यापेक्षा अधिक सर्वोत्तम बनून यातून बाहेर निघायचे आहे. यासाठी, माननीय श्री. रतन टाटांच्या सारखा, आपल्या व्यावसायिक, सामाजिक व राजकीय नेत्यांनी आदर्श निर्माण करायला हवे. पण ते करत नसतील, तर त्यांची सबब देऊन, आपल्याला स्वकर्तृत्वापासून दूर व्हायचे नाही.
परमेश्वर प्रत्येकाला विशेष गुण व कौशल्य देतो. या काळात, तुमच्या गुणांना वाढवणारी व कौशल्यांना अधिक बळकट करणारी, कार्य हाती घ्या.
आपले केंद्र व राज्य सरकार, त्यांचे अथक परिश्रम घेत आहेत. आपण त्यांना केवळ घरी थांबून नव्हे, तर घरात स्वत:ला व घरातील सर्वांना येणाऱ्या भविष्यासाठी तयार करुन सहकार्य करायला हवे.
एक दिवस मुख्य शहरांमध्ये बंद पाळला तर अर्थव्यवस्थेवर ताण येतो. आता तर महिन्यापेक्षा अख्खा देश बंद असल्यामुळे, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहेत?
याने घाबरुन जाण्यापेक्षा, जपानने ज्या पद्धतीने अणुबॉम्बचे हल्ले व भूकंप नंतर सुनामी, अशा संकटांचा सामना केला होता; तोच आदर्श ठेवावा लागेल. माझ्या मते, प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती करताना, जपानी माणसाने देशभक्ती, एकता, शिस्त व स्वतःचे सर्वोत्कृष्ट कामामध्ये देण्याची तयारी; या गुणांचा उपयोग केला होता. चला, आपणही त्याच गुणांना आत्मसात करु या. भाजी मार्केटमध्ये दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सची ऐशीतैशी करणाऱ्यांसाठी व उगाचच बाहेर फिरायला बाहेर पडणाऱ्यांसाठी, हे कठीण आहे. पण, मग पोलीसांनी त्यांच्यासाठी कठीण लाठीचा वापर करायला हवा.
आपण सर्व सुसंस्कृत व्यक्तींनी तरी मनावर घेऊ या! देशाच्या अखंडत्वासाठी व प्रतिष्ठेसाठी, आपले नैपुण्य पणाला लावू या!
न थांबता, न डगमगता....
करु ना, पुन्हा सुरुवात!
आपलाच,
बिपिन मयेकर
कॉर्पोरेट ट्रेनर व वैयक्तिक मार्गदर्शक
७०२१५०८४७०

Comments
Post a Comment