छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढे चालवणार?
हॉस्पिटलमधून परत येताना पाहिले, माझे एक परिचित गृहस्थ, त्यांच्या मित्रांसह उभे होते. सगळे जण एकमेकांना खेटून उभे होते. काही जणांचे, एकमेकांच्या गळ्यात हात होते.
सदर परिचित गृहस्थ, छत्रपती शिवाजी महाराजांचे परम भक्त आहेत. मला घरी परतताना, महाराजांचे किल्लेदाराला लिहिलेले पत्र आठवले. मी शाळेत असताना, आमच्या मराठीच्या शिक्षिकांनी ते पत्र इतक्या छान पद्धतीने शिकवले होते की ते पत्र पण लक्षात आहे व त्यातील मतितार्थ!
छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदारास पत्रात बजावले होते: दिवसरात्र कडा सूक्ष्म पहारा ठेवा. तेलाच्या आमीषाने, उंदीर गडावरील दिव्यांतील तेलाची वात पळवतील. जर ती जळती वात धान्य_आगर किंवा शस्त्रागारावर पडली, तर अनर्थ होईल.
धान्य_आगर पेटले व धान्य जळून खाक झाले तर सैनिकांना खायला काय देणार? उपाशी पोटी सैन्य कसे लढणार? तसेच शस्त्रागारावर जळती वात पडली व दारुगोळ्याचा स्फोट होऊन शस्त्रे नष्ट झाली तरी सुद्धा किल्ला राखायला जड जाईल.
इतका सूक्ष्म विचार करणाऱ्या व सावध असणाऱ्या द्रष्ट्या महाराजांचे आपण नाव घेत असू, तर आपण किती सावध असायला हवे? आपण खरोखरच सूक्ष्म विचार करत आहोत काय?
आज अनेक जण 'आपल्या इथे काही नाही', 'मला काही होणार नाही', इत्यादी बहाण्यांचे समर्थन करत बिनधास्त एकत्र फिरत आहेत.जर चुकून, देव न करो, पण तुमच्यातील एखाद्याला लागण झाली, तर एकामुळे वीस, वीसमुळे चारशे व चारशेमुळे चार हजार व्हायला वेळ लागणार नाही.
माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे वारंवार आपल्याला सूचना देत आहेत. तुम्ही त्यांच्या सूचनांचा मान राखत आहात काय?
फॉरवर्डेड मेसेजेस पैकी, खरोखरच किती मेसेजेस, फॉरवर्ड करणारे वाचत असतात. माझ्या जुन्या मित्रमैत्रिणींच्या एका वॉट्सॲप ग्रुपमध्ये दिवसाला शेकडो मेसेजेस येतात व त्यातील ९०% मेसेजेस हे फॉरवर्डेड असतात. काही तर त्याच ग्रुपमधले न वाचता, परत परत फॉरवर्ड केलेले असतात. अशा शूरवीरांना व बुद्धीमंतांना काय बोलायचे? आणि यातील बहुतेक जण महान व्यक्तींचा वारसा सांगत असतात.
आता जे वाचले आहे व जे समजले आहे, त्याचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील व मुंबईतील माणसांचे व कुटुंबांचे गड शाबूत ठेवायला हवेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या आपण सर्वांनी जास्तीत जास्त सावध होणे; आवश्यक आहे.
जय हिंद| जय महाराष्ट्र|
बिपिन मयेकर ©
९८१९००१२१५

Comments
Post a Comment