चला होऊ या हिरकणी!
चला, होऊ या हिरकणी!
रायगडाच्या पायथ्याखाली असणारे एक वाळेसर नावाचे छोटेसे गाव…. त्या गावातील एक धनगर कुटूंब. कुटूंबाचा उदरनिर्वाह घरातील गुरांचे दुधावर चाले…. घरातील दुध गडावर घेऊन जाण्याचे काम ह्या घरातील स्त्री हिरा करायची….
*तुम्ही कोण आहात, यापेक्षा तुम्हाला काय मिळवायचे आहे; ते जास्त महत्त्वाचे असते.*
हिरा ही एका तान्हुल्याची माता. त्या दिवशी पण ती गडावर पोहचली दुध विकायला. पण संध्याकाळ होऊन गेली. आता तिच्या लक्षात आले की गडाचे दरवाजे बंद झाले असणार. रायगडावर जाण्यायेण्यासाठी फक्त मुख्य दरवाजा….
*कित्येकदा तुम्हाला ज्या मार्गाने यश मिळणार, यांची खात्री असते, तो मार्गच बंद होतो.*
रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही.
*आता यापुढे काहीच शक्य नाही, असे वाटते.*
तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते… ह्या मातेला आता डोळ्यासमोर फक्त बाळाचा चेहरा दिसत होता…. आता कुठल्याही परिस्थतीत घरी पोहचायचं आहेच. आणि ह्या मातेचा निर्णय इतिहासाला दखल घ्यायला लावणारा होता…
*तुमचा असा कोणता निर्णय, इतिहासाला तुमची दखल घ्यायला लावू शकतो?*
*हिरकणीला बाळाचा चेहरा दिसत होता. तुमच्या आयुष्यात असे कोण महत्त्वाचे आहे? ज्यांच्यासाठी तुम्ही हिरकणी सारखे प्रयत्न कराल?*
आता ती एकटीच गडावर फिरु लागली. खाली उतरण्यासाठी रस्ता शोधू लागली. ४४०० फुट उंचावरून आता ह्या मातेने खाली उतरायला सुरवात केली….
*तुम्ही प्रवासाला सुरुवात करायलाच घाबरत आहात काय?*
*चला, होऊ या हिरकणी!*
रात्रीची वेळ सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरलेले. रातकिड्यांचा शांतता भंग करणारा आवाज. त्याच आवाजामध्ये एखाद्या हिंस्त्र जंगली पशूचा आवाज. सगळी झाडे झुडपं पसरलेली. त्या सार्यामधून ही माता वाट काढत घराकडे निघाली. आता तिला ह्या घनदाट जंगलाचे भय वाटत नव्हते. कुठल्याही पशुपक्ष्यांचे किंवा इतर कुणाचे भय वाटत नव्हते.
*तुम्ही कशामुळे निर्भय व्हाल?*
कारण आता ती एक सामान्य स्त्री नव्हती. तर ती आता वात्सल्याने भरलेली फक्त माता होती. आता तिच्या चेहर्यासमोर भूकेने व्याकूळ, रडणारे तिचे बाळ दिसत होते…
*तुम्हाला 'असामान्य' बनवणारे बाळ अर्थात तुमचे ध्येय कोणते?*
ज्या गडाच्या मुख्य दरवाजा खेरीज कुणाला जाणं येणं शक्य नाही. आजूबाजूने गडावरून उतरणं किंवा गडावर चढणं अशक्यच पण ते अशक्यप्राय काम ह्या मातेने केले होते… ती घरी पोहचली त्या वेळेस तिच्या सर्वांगावर जखमांचे साम्राज्य पसरले होते…
*तुम्ही काय काय त्रास सहन करायला तयार आहात?*
घरी पोहचल्यावर तिने बाळाला उचलून घेतले आणि तिला तिच्या जखमांचा विसर पडला…
*तुम्ही तुमचे ध्येय गाठल्याचा दिवस कसा असेल?*
दुसर्या दिवशी महाराजांना ही बातमी समजली. गड उतरून जाणं ही अशक्यप्राय गोष्ट होती…. महाराजांनी बोलवून त्या मातेचा सन्मान केला…
*तुमचा सत्कार कोण व कसा करेल?*
ती उतरली त्या ठिकाणी बुरुज बांधला त्याला हिरकणी बुरुज नाव दिले….
*सामान्य हिरकणी ने इतिहासात आपले नाव असामान्यपणे कोरले. तुमचे नाव कुठे असेल?*
आज जागतिक महिलादिना निमित्त या मातेचे स्मरण करायला हवे. पण महत्त्वाचे म्हणजे, तिने दाखवलेल्या रस्त्यावरुन चालायला हवे.
बिपिन मयेकर
९८१९००१२१५

Comments
Post a Comment