मुलांना बिघडवतंय कोण?

नमस्कार, 

कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या, चोरपोलीस, लपाछपी; असे 'अवखळ आनंदी बालपण' जगले होते, त्यातील किती जणांनी आपल्या मुलांना (कदाचित हेच खेळ नसतील) असाच अवखळ आनंद लुटण्यासाठी 'खुले वातावरण' दिले आहे?

निव्वळ वस्तू म्हणजे प्रेम नव्हे. केवळ "मला मिळाले नव्हते, ते तुला घे!" यातून नात्यांकडे दुर्लक्ष करणारी उपभोगवादी प्रवृत्ती निर्माण होत जाते.
स्वातंत्र्याला जबाबदारीची जोड नसेल तर बेफिकीर वृत्ती घडत जाते.

लहानपणी प्रत्येकी पाच पैसे काढून पाच मित्र, अर्ध्या तासासाठी सायकल भाड्याने आणत होते. त्या पाच पैशाचे महत्त्व वाटत होते. कारण त्या पाच पैशांच्या किमतीपेक्षा, त्यांचे मूल्य समजत होते. हल्ली जरा हट्ट केल्यावर, घेऊन दिलेली, चाळीस हजारांची मोटर सायकल सुद्धा बेफिकीरीने चालवली जाते.

मुलं बिघडत नसतात, तर आपण बिघडवत असतो.

काही पालकांकडे, मुलांना द्यायला बक्कळ पैसे असतात, पण पुरेसा वेळ मात्र नसतो.

याउलट काही पालक, आपले आयुष्य मुलांशी बांधून घेतात. त्यांचा शक्य तितका वेळ ते मुलांसोबतच घालवतात. मुलांना श्र्वास घ्यायला सुद्धा स्वतंत्र वेळ देत नाहीत.

मुलांच्या भविष्याची इतकी घनघोर चिंता त्यांना सतावत असते की मुलांचा सर्व वर्तमानकाळ ते अभ्यासाला जुंपतात. मुलांना अत्यंत कडक शिस्तीत वाढववतात. कित्येकदा, यातून मोठेपणी, मुले एकतर पूर्ण भिडस्त होतात, समोरच्या व्यक्तीचे काहीही बोलणे ऐकून घेऊ शकतात. त्यांना स्वत: चे सत्व नसते. अथवा 'रागावून बोलण्यानेच समोरचा ऐकतो' या मताचे होतात.

कडक शिस्तीमागे पालकांची भावना शुद्ध असली तरी, अतितणावाचा मुलांच्या व्यक्तीमत्वावर, पर्यायाने आयुष्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

एक तरुण हुशार डॉक्टर, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांबरोबर, अत्यंत उर्मट भाषेत बोलताना बघितला, तेव्हा लगेच लक्षात आले खरी गोम, त्याच्या बालपणात दडलेली होती. त्याला उलट दमात घेणाऱ्यांबरोबर, तो सरळ वागत व बोलत होता. अशा मनःस्थितीत असणाऱ्या त्या युवकावर किती तणाव असेल?

प्रचंड बुद्धिमत्ता असलेला, एक तरुण व्यवस्थापक, चारचौघांत बोलताना, अवघडलेला दिसत होता. मनुष्यबळ हाताळण्यासाठी, संवाद_कौशल्य हा एक महत्त्वाचा गुण अपेक्षित असणाऱ्या, बढतीच्या जागेसाठी त्याचा विचार कसा होईल?

हे दोघे परवडले, कारण काही तरुण_तरुणी व्यसनाधीन झालेले आढळतात.

काही चुकीचे घडले तर, स्वत: कोणतीच जबाबदारी न घेता; राजकारणी, पोलीस, समाज, इत्यादींना दोष देणारे, पालक लहानपणापासून बघत_ऐकत व अनुभवत आलेल्या मुलांची वाढ त्याच समजूतींमध्ये होऊ शकते.

आपण पालक म्हणून जे काही मुलांसाठी त्यांच्या लहानपणापासून करतो, ते सर्व आपली मुले कोणत्या दृष्टिकोनातून स्विकारत आहेत व अंगिकारत आहेत; ते तपासता आले पाहिजेत. त्यात आपले काही चुकत असेल तर वेळीच सुधारता आले पाहिजे, अन्यथा नंतर मोठेपणी मुलांना भोगावे लागते.

घरामध्ये मूलभूत शिस्तीचे पण मोकळेपणा असलेले वातावरण असायला हवे. आपल्या मुलांना शाळाकाॅलेजचे, पुस्तकी शिक्षण देताना; जीवनाच्या शाळेचे प्रशिक्षण सुद्धा देता आले पाहिजे. ताणतणाव नियोजन कसे करावे, वेगवेगळ्या माणसांशी कसे वागावे, वेळाशी निगडीत कामाचे नियोजन कसे करावे, इत्यादी कौशल्ये मुलांना लहानपणापासूनच शिकवता आली पाहिजेत.

यानंतरही मोठेपणी मुले चुकणार नाहीत, असे नव्हे, पण मुळापासून उखडण्यापेक्षा, फांद्या कापलेल्या परवडतील.

~ बिपिन मयेकर
७०२१५०८४७०

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?