सगळ्याच सुना वाईट नसतात

सगळ्याच सुना वाईट नसतात..

फेसबुकवर व वॉट्सअपवर माझ्या मित्राने पाठवलेली गोष्ट शेअर केली आणि मैत्रिणींचे तसेच मित्रांच्या बायकांचे फोनचा भडिमार सुरु झाले.

गोष्टीचा सारांश:


आई, पत्नी व लहान मुलगी, अशा गोड संसारात रममाण असलेल्या पतीला अचानक, बायकोच्या सांगण्यावरुन आईला वृद्धाश्रमात घेऊन जावे लागते. जाताना वाटेत, मुलाला वडील वारल्यानंतर, आईने उपसलेले कष्ट आठवत जातात व तो आईला परत घरी घेऊन जाण्याचे ठरवतो.

इथे घरी सुनेला, सासूच्या पलंगावर जुनी पर्स दिसते. उघडून बघते तर आत सासूने, सर्व संपत्ती तसेच दागिने, आपल्या सुनेच्या व नातीच्या नावावर केलेली कागदपत्रे असतात. सून कावरीबावरी होऊन होते.

मुलगा आईला घेऊन परत येतो, तेव्हा ती सासूच्या गळ्यात पडून ढसाढसा रडते.


फोनवर सगळ्या भगिनींचा एकच सूर होता - सगळ्याच सुना वाईट नसतात. मला पण हे मान्य आहे. त्या गोष्टीतली पार्श्वभूमी वेगळी होती. प्रत्येक कुटुंबातील पार्श्वभूमी वेगवेगळी असू शकते.

मूलभूतपणे, टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात एकत्र यायला हवेत. तसेच सुखी कुटुंबासाठी, सासू व सून, दोघींनीही समजूतदार असणे आवश्यक असते. सून, लग्न करुन येताना, आपल्या संसाराची स्वप्ने रंगवून येत असते. तिच्या स्वतःच्या संसाराबद्दल ठराविक अपेक्षा असतात. तसेच होणाऱ्या सासूबद्दल कित्येकदा पूर्वग्रह तयार झालेला असतो. काही मुली घरी लाडावलेल्या असतात. तिथे 'हम करे सो कायदा' अशी परिस्थिती असते. मग सासरी सुद्धा त्याच अपेक्षा घेऊन आगमन होते. मग त्या कुटुंबात काय होणार?

कित्येकदा, ज्या आईने आपल्या मुलाला खूप प्रेमाने मोठे केले असते, तिला आपल्या मुलाला गमावण्याची भिती वाटत असते. काही स्त्रियांचे सर्व विश्व, त्यांचे किचन असते. कुटुंबात त्यांचे अस्तित्व व महत्त्व, किचनमुळे निर्माण झाले असते. त्यांना भावी सुनेमुळे आपली किचनमधील सत्ता गमावण्याची चिंता सतावू लागते. त्यामुळे, लग्नानंतर, मनमिळाऊ आईचे कटकटी सासूमध्ये रुपांतर होऊ शकते.

कुटुंबाचे कळत नकळत नियंत्रण कोणाकडे असावे, यावरुन तक्रारींची सुरुवात होते व पुढे कलह वाढत जातो. छोटेछोटे निर्णय घेण्यावरुन वाद सुरु होतात व नंतर मोठी भांडणे होऊ शकतात.

आईने, सुनेच्या भविष्याचा तारतम्याने विचार केला व सुनेने, सासूच्या भूतकाळातील कष्टांचा सहानुभूतीने विचार केला; तर दोघींनाही एकमेकीची बाजू समजू शकते. आईने सुनेमध्ये, आपली मुलगी बघितली व सुनेने, सासूमध्ये आपली आई बघितली तर नक्कीच नाते सुदृढ होऊ शकते. आईने, स्वतःचे लग्न झाले होते, तेव्हाची परिस्थिती किंवा तेव्हाचा काळ लक्षात घेतला, तर सुनेच्या अपेक्षांची जाणीव होऊ शकते.

सुनेने, आपण वयस्कर झाल्यावर, आपली सून/जावई आपल्याबरोबर अशीच वागली तर आपली अवस्था कशी असेल, याचे विश्लेषण केल्यास, सासूच्या अपेक्षांची जाणीव होऊ शकते.

अर्थात, तणावाची ठिणगी पडत असतानाच, 'माझे काय चुकते आहे काय?' असा प्रश्न दोघींच्याही मनात उमटायला हवा. पण स्वतःची चूक शोधायची तयारी नसेल व समोरच्या व्यक्तीलाच जबाबदार धरण्याची मनोवृत्ती असेल तर मग महाभारत होणारच.

या सर्व प्रकारांमध्ये, मुलाची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण,

१. जेव्हा सासू खाष्ट असते व सून अतिनम्र असते, तेव्हा सुनेला सासुरवास होतो. इथे मुलगा आईच्या पदराला बांधलेला बाळ असेल तर आईला चेव येतो.

२.  जेव्हा सून स्वकेंद्रित असते व सासू अतिसमजूतदार असते, तेव्हा सासूला जाच होतो. इथे मुलगा बायकोच्या हुकुमाचा ताबेदार असेल तर आउच्य आयुष्याची दैना होते.

वरील दोन्ही प्रकारांत, मुलाकडे ठामपणा व कल्पकता असेल तर तो दोघींपैकी जी कोणी चुकत असेल तर त्यांना कल्पकतेने व ठामपणे, त्यांची चूक लक्षात आणून देत वठणीवर आणू शकतो.

३. जेव्हा दोघीही खाष्ट असतात व घराचे रणांगण होते. इथे मुलगा मिळमिळीत असेल, तर त्याचे दोघींमध्ये सँडविच होते.
अशा वेळी, मुलाला थोडी आक्रमक भूमिका घ्यावी लागते. त्या आक्रमकतेला सुद्धा कल्पकतेची जोड द्यावी लागते. म्हणजे, साँप भी मरे और लाठी भी ना टुटे।

४. दोघीही समजूतदार असतील तर घराचा स्वर्ग होऊ शकतो. फक्त मुलगा पण तसाच समजूतदार हवा. तो दिवटा किंवा व्यसनी असेल तर दोघींची फरफट होते. मुलगा समजूतदार व हुशार असेल तर घरामध्ये सुखशांती नांदते.

आईला मुलगी पण असेल तर तिला सासूने चांगल्या रितीने कसे वागवायला हवे आणि सनेने, स्वतःच्या आईला, तिच्या सुनेने चांगल्या रितीने कसे वागवायला हवे, याचा आदर्श घेत, स्वतःचे वर्तन व संवाद ठेवला तरी घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल.

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?