श्रीमंत, गरीब व समृद्ध

 श्रीमंत, गरीब व समृद्ध

पैसा अत्यंत महत्वाचा आहे. श्रीमंत किंवा समृद्ध, हे कधीच पैशाला नावे ठेवत नाहीत. फक्त गरीब असलेले, कित्येक जण पैशाला नावे ठेवताना दिसतात, कारण पैसा कमवण्याची त्यांची वृत्ती नसते.

व्हाट्सअप वर मेसेज फिरत असतात पैसा म्हणजे कागद आहे त्यापेक्षा मित्र जमा करा. खर आहे, मित्रांची आवश्यकता प्रत्येकाला असते. पण पैशाशिवाय आपली जगातील कामे होणार आहेत काय? 

काही वेळेला मेसेज असतो, पैशापेक्षा माणुसकी चांगली! हो कधीही! पण केवळ माणुसकीने कित्येक कामे होत नाहीत. त्या माणुसकीला पैशाची जोड असावी लागते. तुमच्या एखाद्या मित्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आणि तुम्ही हॉस्पिटलला सांगितलेत, 'माझ्याकडे खूप माणुसकी आहे. ती जमा करा.' चालेल काय? 

मग लक्षात घ्या, पैसा खूप आवश्यक आहे. 

फक्त तो किती कमवायचा याच्या मर्यादा आपणच आखून घेतल्या पाहिजेत. त्याबरोबर आपली कर्तबगारी वाढवायला हवी. 

पैसा कमावता येत नाही, म्हणून पैशाला नावे ठेवणे चुकीचे आहे. 

एकदा दादरमध्ये ग्रीन सिग्नल गाडीला असतानाही, मधून गाडीसमोरुन माणसे जात होती. तेव्हा मी उदगारलो, 'जसे सिग्नल तोडला तर गाडी चालकाला दंड भरावा लागतो. तसेच पादचाऱ्यांना ही दंड भरायला लागला पाहिजे.' यावर माझा ड्रायव्हर मला समजावू लागला, 'जे चालत आहेत त्यांच्यापेक्षा गाडीतून प्रवास करणारे श्रीमंत आहेत. तेव्हा दंड हा फक्त श्रीमंतांना व्हायला हवा. मी गप्प बसलो. कारण माझे तर्कशास्त्र त्याच्या समजुतीच्या बाहेर होते. 

रॉबिनहूड ही संकल्पना याच विचारांवर आली होती. 'श्रीमंतांना लुटा व गरीबांमध्ये वाटा.' आताची टॅक्स ही संकल्पनासुद्धा सुद्धा नकळतपणे रॉबिनहूड चेच प्रतिक आहे. म्हणजे जे चांगला पैसा कमवू शकतात, त्यांचा पैसा काढून घ्या व तो समाजामध्ये खर्च करा. चांगली संकल्पना आहे. पण समाजातील कित्तेक घटक, हे अशा फुकट मिळणाऱ्या सोयीसुविधांमुळे चंगळवादी बनले आहेत. ते आपले पूर्ण प्रयत्न करत नाहीत. कारण सरकारतर्फे त्यांना गरीब असल्याचा विविध पद्धतीने फायदा होत असतो. विचार करा. 'Rich Dad, Poor Dad' या पुस्तकात याचे चांगल्या रितीने विश्लेषण करण्यात आले आहे. अवश्य वाचा. पैशाबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलून जाईल

जेव्हा तुमचे उत्पन्न हे तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त असते, तेव्हा तुम्ही श्रीमंत असता. 

पण जेव्हा तुमचे उत्पन्न हे तुमच्या अपेक्षांपेक्षा कमी असते, तेव्हा तुम्ही गरीब असता. 

आणि जेव्हा तुम्ही तुमच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवत अपेक्षा वाढवता व त्याचप्रमाणे आपले उत्पन्न वाढवता तेव्हा तुम्ही समृद्ध असता.

श्रीमंती चांगल्या व वाईट कोणत्याही मार्गाने येऊ शकते. समृद्धी नेहमी चांगल्या मार्गाने येते. 

श्रीमंत माणसाला वेगवेगळी व्यसने असू शकतात. समृद्ध माणूस, हा कोणत्याही व्यसनाच्या आधीन नसतो. 

श्रीमंत माणसाला पैसा एके पैसा एवढेच माहीत असते. तर समृद्ध माणूस पैसा तर कमावतोच, परंतु त्याबरोबर समृद्ध व्यक्तीचे विचार चांगले असतात. 

समृद्ध माणसाकडे नम्रता असते. तसाच ठामपणा सुद्धा असतो. 

समृद्ध माणूस हा एकवेळ धार्मिक नसेल, पण तो निश्चितच आध्यात्मिक असतो. 

समृद्ध माणूस हा आपले नातेसंबंध स्नेहपूर्ण रितीने जपत असतो. 

समृद्ध व्यक्ती साहित्य, कला, क्रिडा, पर्यटन अशा विविध चांगल्या छंदांमध्ये रुची घेत असते. 

तेव्हा केवळ श्रीमंत नको तर समृद्ध व्हावा.


आपलाच,

बिपिन मयेकर

myself.bipin@yahoo.co.in





Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?