३. द्वेष: दुसऱ्याला त्रास व्हावा, म्हणून स्वतःच्या हातावर ठेवलेला निखारा

हेवा, मत्सर व द्वेष:

मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना

लेखक: बिपिन मयेकर ©


भाग ३. द्वेष: 

दुसऱ्याला त्रास व्हावा, म्हणून स्वतःच्या हातावर ठेवलेला निखारा!


हेवा तात्कालिक असेल तर तो नैसर्गिक भावनेचे प्रतिक असतो.

पण हेवा सातत्याने मनामध्ये मुरत राहिला की, त्याचे मत्सरामध्ये रुपांतर होऊ शकते. 'मत्सर' ही नकारात्मक भावना आहे.

पण, द्वेष ही पराकोटीची नकारात्मक भावना आहे. 'द्वेष' ही भावना ज्याच्या मनात शिरते, ती त्याचे आयुष्य खाऊन टाकते. 'द्वेष' करणारी व्यक्ती, स्वतःपेक्षा, ज्या व्यक्तीचा द्वेष करत असते, त्याचाच सतत विचार करत राहते. 'द्वेष' करणाऱ्या व्यक्तीचे, स्वतःचे असे आयुष्य शिल्लक राहत नाही.

'द्वेष', ही एखाद्यासाठी (शक्यतो एकदम जवळच्या वा परिचित व्यक्तीप्रती) तीव्र नापसंतपणाची भावना असते. 

त्या व्यक्तीस टाळणे, त्याची मुस्कटदाबी करणे, निंदानालस्ती करणे, त्याच्याबद्दल अफवा पसरवणे किंवा टोकाची भावना म्हणजे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिष्ठेला नष्ट करणे ही इच्छा असते.

द्वेष, ही भावना एकदा मस्तकात शिरली की, ती भल्या भल्या व्यक्तींमधील चांगुलपणा नष्ट करते.

'द्वेष' जेव्हा ताबा घेतो, तेव्हा या व्यक्ती आपल्या चुकीच्या वागण्या_बोलण्याचे अतिरिक्त समर्थन करत राहतात.

यांच्या बहुतेक कारवाया या पाठीमागून होतात. यांना साथ देणाऱ्या व्यक्ती सुद्धा 'नकारात्मक' भावनांनी पछाडलेल्या असतात.

लक्षात ठेवा, तुमचा द्वेष करणारे, कळत-नकळत स्वतःचाच द्वेष करत असतात. कारण एकतर त्यांना स्वतःच्या अगतिकतेची चिड असते किंवा त्यांना तुमच्यासारखे बनायचे असते व बनता येत नसते. तुम्ही समोर आलात किंवा तुमच्या गुणांचा विचार त्यांच्या मनात डोकावला की त्यांना स्वतःचे दोष वा कमतरता जाणवते.

त्यामुळे, जे तुमचा द्वेष करतात; त्यांना क्षमा करा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. परमेश्वर त्यांच्या कृत्यांवर लक्ष ठेवतो आहे.

दगडावर डोके आपटले तर डोके फुटते. म्हणून दगडांपासून दूर रहा. हो, पण दगड अंगावर आला तर डोके सांभाळा. अशा वेळी, शेवटचा पर्याय म्हणजे दगड फुटला तरी चालेल. त्या व्यक्तीला योग्य शिक्षा झाली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांनी पण शिशुपालाचे शंभर अपराध माफ केले होते.

काही जण, स्वतःचाच द्वेष करतात. 

स्वतःमधील चांगल्या गुणांना व स्वत:कडील चांगल्या बाबींना ओळखा. शक्य असल्यास, त्यांची यादी करा. ती यादी सतत स्वत:समोर ठेवा.

तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांविषयी सजग रहा.

ध्यानधारणेचा वापर करा.

दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करत असाल, तर प्रामाणिकपणे, त्या व्यक्तीच्या नजरेतून द्वेष निर्माण झालेल्या घटनांबद्दल विचार करा. तुमचे काही चुकले होते काय, हे शोधण्याचा प्रयत्न करा. कठीण आहे, पण प्रयत्न तर करता येईल.

द्वेष निर्माण झाला की संवाद बंद होतो. जेव्हा मन मोकळे करुन संवाद होतो, तेव्हा बहुतेक गैरसमज दूर होण्याची शक्यता असते.

'Forgive and Forget' हा आदर्श मंत्र आहे. इतका आदर्शवाद झेपत नसेल तर forget करु नका पण forgive करा. कमीत कमी, द्वेष ही टोकाची भावना मनात रुजवण्याऐवजी, त्या व्यक्तीपासून दूर व्हा. दुर्लक्ष करा. स्वतःच्या आयुष्यावर प्रेम करा.

Maya Angelou यांच्या मते, द्वेष केल्याने अनेक समस्या उभ्या राहू शकतात, पण उत्तर एकाचे सुद्धा मिळत नाही. 

माझ्या मते, द्वेष केलात तर तो अनाठायी हिंसेचा करा, अन्यायाचा करा, भ्रष्टाचाराचा करा, स्त्रियांवरील व लहान मुलांवरील अत्याचाराचा करा, स्वतःच्या स्वार्थासाठी होणाऱ्या लोचटगिरीचा करा, इतरांना कमी लेखणाऱ्या गर्विष्ठपणाचा करा, माणसे स्वार्थासाठी वापरुन घेणाऱ्यांचा करा..... पण तिथेच थांबण्याऐवजी, त्यांच्यावरील उपायांसाठी विधायक कृती (constructive action) करा.

यातसुद्धा, द्वेष दोषांचा करा. व्यक्तींचा नव्हे. तो द्वेष तुमच्यावर कब्जा करणार नाही, याची काळजी घ्या.

रोग संपला पाहिजे, रोगी नाही.

“Life becomes a lot easier when you learn to accept an apology you never got.” 

~ Robert Brault

द्वेष करणाऱ्यांचा, तुम्ही द्वेष करण्याचे टाळावे. अन्यथा, ते विजयी होतील व व नकारात्मक भावनेचा राक्षस तुमच्या मनात प्रवेश करेल.

कित्येकदा, खूप जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होतो, तेव्हा बहुतेक वेळा, 'द्वेष' करणारे बदला घेण्यासाठी उतावीळ असतात. पण लक्षात ठेवायला हवे की,

“Before You Embark On A Journey Of Revenge, Dig Two Graves” — Confucius

जेव्हा तुम्ही इतरांना उध्वस्त करायला निघता, तेव्हा आकर्षणाच्या नियमाने, सर्व नकारात्मक भावना तुमच्याकडे आकर्षित होत जातात. समोरच्याला उध्वस्त करताना, तुमची सकारात्मकता, तुमचा चांगुलपणा व तुमचे नातेसंबंध उध्वस्त होऊ शकतात. 

दुसऱ्या बाजूने विचार करा की, तुमची सकारात्मकता, तुमचा चांगुलपणा यांचा वापर करुन, तुम्ही स्वतःच्या आयुष्यात किती प्रगती करु शकता.. तुमचे नातेसंबंध चांगल्या प्रकारे दृढ करु शकता.. समाजात किती चांगले विचार रुजवू शकता...

शेवट करताना, एकच विशेष नमूद करेन की, कोणतेही पाऊल उचलताना, त्याच्या परिणामांचा विचार व्हायला हवा. तुम्ही इतरांचा वा स्वतःचा द्वेष केल्याने काय साध्य होणार आहे? तुमच्या व तुमच्या परिवारासंबंधी काय चांगले व काय वाईट होऊ शकते? असा सर्वंकष विचार करा.

आपलाच,

बिपिन मयेकर

myself.bipin@yahoo.co.in





Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?