हे दिवस पण जातील!

हे दिवस पण जातील!

मागील वर्षभरात, अनेक चांगल्या व्यक्तींना भेटण्याचा योग आला. यात व्यावसायिक वा सामाजिकदृष्ट्या यश मिळवणारे होते तसेच अपयशाचा सामोरा करावे लागणारे पण होते. काही जणांना नोकरी अथवा व्यवसायात घवघवीत यश मिळाले होते तर काही जणांचा व्यवसायातील फायदा कमी कमी होत गेला किंवा नोकरीमध्ये विविध समस्या उद्भवत गेल्या.

पण यातील बहुतेक व्यक्ती अलगद नकारात्मकतेच्या जाळ्यात अडकत चालल्याचे लक्षात येत आले आहे.

यात त्यांचे पूर्णतः चुकते आहे, असे नव्हे. कारण यशाच्या गर्वात किंवा अपयशाच्या चिंतेमध्ये, मनाभोवतीच्या सावधपणाच्या भिंती कोसळू लागतात.

यशाच्या गर्वात, दोषांची जाणीव झाली नाही की मग नकारात्मक विचार व नकारात्मक तत्वे, हळूवारपणे मनात शिरत जातात.

याउलट, कठीण परिस्थितीत मन अस्थिर होऊ शकते. गोष्टी मनासारख्या होत नाहीत, तेव्हा चांगल्या तत्वांचा आधार वाटत नाही. कमकुवत मनामध्ये मग नकारात्मक विचार व नकारात्मक तत्वे, हळूवारपणे शिरत जातात.

मग नैराश्य, राग, चिडचिडेपणा अशा नकारात्मक भावना वाढत जातात. चांगुलपणावरचा विश्वास कमी होऊ लागतो. जीवनात प्रयत्न करण्यासाठी आवश्यक 'आशा' नष्ट होत जाते, जिद्द कमी होत जाते.

या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी, वास्तवतेला परखडपणे सामोरे जाणे, आवश्यक असते. खऱ्या परिस्थितीची जाणीव, एकदा झाली की मनाच्या मैदानात हळूवारपणे सकारात्मकता पेरता आली पाहिजे.

ज्या गर्विष्ठ व्यक्ती असतात, त्यांनी सर्वप्रथम कृतज्ञता अंगी बाळगायला शिकायला हवे. उपकारांची व मदतीची जाण ठेवली, की अहंपणा कमी होत जातो. बोलण्यातील 'मी'पणा कमी करत, 'आपण' व 'आम्ही'चा वापर वाढायला हवा.

कळत नकळत नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींनी, स्वत:वरचा विश्वास वाढवण्यासाठी, खालील पुष्ठीकरण सतत स्वत:वर बिंबवले पाहिजे.
"देवाच्या आशीर्वादाने, मी आव्हानांना सामोरे जाऊ शकतो."

गर्विष्ठ असो वा नैराश्यग्रस्त, अथवा सर्वसामान्य; खालील विचार आपल्याला भरकटू देत नाही.
'हे दिवस पण जातील!'

चांगल्या दिवसांत, 'हे दिवस पण जातील!' लक्षात ठेवले की पाय जमिनीवर राहतात. आणि, कठीण दिवसांत 'हे दिवस पण जातील!' लक्षात ठेवले की आशेची ज्योत तेवत राहते. माणूस जिद्दीने प्रयत्न करत राहतो.

आपलाच,
बिपिन मयेकर








Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?